इराणच्या लष्करी तळावरील संशयास्पद स्फोटात दोन ठार

- ड्रोन हल्ला झाल्याचा संशय

संशयास्पद स्फोटात दोन ठारतेहरान – इराणच्या पारचीन येथील लष्करी तळावर झालेल्या संशयास्पद स्फोटात दोन जण ठार तर अनेकजण जखमी झाले. लष्करासाठी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या या तळात झालेल्या दुर्घटनेमुळे इंजिनिअरचा बळी गेल्याचे इराणने म्हटले आहे. पण अणुकार्यक्रमाशी संबंधित पारचीन येथील या स्फोटाबाबत इराण लपवाछपवी करीत असल्याचे दावे इस्रायली माध्यमांनीही केले आहेत. तर इराणच्या या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झाल्याचा दावा इस्रायलच्या सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

इराणची राजधानी तेहरानपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पारचीन लष्करी तळआहे. येथे इराणच्या लष्करासाठी क्षेपणास्त्रनिर्मितीचे काम केले जाते. तसेच इराणच्या छुप्या अणुकार्यक्रमाशी देखील या पारचीन लष्करी तळाचा संबंध असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता. अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या या तळात बुधवारी दुपारी मोठा स्फोट झाला होता. इराणच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पारचीन तळावर दुर्घटना घडून यात एका इंजिनिअरचा बळी गेला. पण इराणमधील इतर माध्यमांनी पारचीनच्या मुख्य प्रकल्पात स्फोट झाल्याची माहिती दिली. तसेच या हल्ल्यात इंजिनिअरसह आणखी एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाल्याचे इराणी माध्यमांनी जाहीर केले. पण दरवेळी आपल्या देशातील स्फोटांसाठी इस्रायलला जबाबदार धरणाऱ्या इराणी माध्यमांनी पारचीनमधील स्फोटाबाबत कुणावरही आरोप करण्याचे टाळले.

मात्र इस्रायलच्या सोशल मीडियावर एकाने पारचीन तळावर ड्रोन हल्ल्याचा दाट संशय व्यक्त केला. वर्षभरापूर्वी इराणच्या करज अणुप्रकल्पावर देखील असाच संशयास्पद स्फोट झाला होता. तेव्हादेखील इराणने ही दुर्घटना असल्याचे म्हटले होते. पण महिन्याभरानंतर सॅटेलाईट फोटोग्राफमध्ये करज अणुप्रकल्पाचे नुकसान झाल्याचे उघड झाल्यानंतर इराणने इथे ड्रोन हल्ला झाल्याचे मान्य केले होते. इस्रायली माध्यमांनी याची आठवण करून दिली आहे.

पारचीन लष्करी तळ इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी जोडलेला आहे. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमासाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा देखील या तळावरुन केला जातो. त्यामुळे इराणच्या लष्करी कार्यक्रमासाठी पारचीन तळाचे मोठे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत, या तळावर झालेल्या स्फोटाकडे संशयाने पाहिले जाते.

चार दिवसांपूर्वीच इराणच्या कुद्स फोर्सेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सदर अधिकारी इस्रायलविरोधी कटकारस्थानात सहभागी असल्याचे उघड झाले होते. या हत्येनंतर अवघ्या दोन दिवसात पारचीन तळावर स्फोट झालेला आहे, ही बाब इस्रायली माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

leave a reply