कोरोना लसीकरणाचा जागतिक विक्रम एका दिवसात ८० लाख जणांचे लसीकरण

नवी दिल्ली – पंधरादिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेले लसीकरणाचे नवे धोरण लागू झाले. आता केंद्र सरकारच्याच वतीने १८ ते ४५ वयोगटादरम्यानच्या नागरिकांचेही मोफत लसीकरण हाती घेण्यात आले आहे. या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी विक्रम झाला आहे. एका दिवसात ८० लाख जणांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. जगात कोणत्याही देशात एका दिवसात इतक्या जणांचे लसीकरण झालेले नाही.

कोरोना लसीकरणाचा जागतिक विक्रम एका दिवसात ८० लाख जणांचे लसीकरणभारत सरकारने डिसेंबरपर्यंत सुमारे ९५ कोटींहून अधिक जणांच्या लसीकरणाचे लक्ष ठेवले आहे. हे शक्य करायचे असेल, तर दिवसाला १ काटी लसीकरणाची क्षमता असायला हवी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी नीति आयोगाने लसीकरणाची क्षमता ७५ लाखांच्या पुढे जाईल, तसेच पुढील दोन महिन्यात ती एक कोटीच्या पुढे गेलेली असेल, असा दावा केला होता. ५ एप्रिल रोजी एका दिवसात देशभरात ४५ लाख जणांचे लसीकरण झाले होते. तेवढी क्षमता भारताचे मिळविली होती. मात्र नंतरच्या काळात लसींच्या कमतरतेमुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले नव्हते.

१ मे पासून राज्यांना १८ ते ४५ वर्ष वयोगटादरम्यानच्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणाअंतर्गत राज्यांना देशात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन उत्पादनांपैकी २५ टक्के साठा खरेदी करता येणार होता. तर २५ टक्के लसी या खाजगी रुग्णालये व संस्थांना खरेदी करण्याची मुभा होती. तर ५० टक्के लसी या केंद्र सरकार ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी खरेदी करीत होती. मात्र लसीकरणाची व्याप्ती वाढल्यावर व तुलनेत लसींची उपलब्धता कमी असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला होता. तरीही दिवसाला सुमारे ३० लाख जणांचे लसीकरण देशभरात होत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केेंद्र सरकारने नवे लसीकरण धोरण जाहीर केले. राज्यासमोरील अडचणी पाहता १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी राज्यांना मोफत लसींचा पुरवठा २१ जून पासून करण्यात येईल, असे केंद्राने स्पष्ट केले होते. यानुसार सोमवारपासून हे लसीकरण देशभरात सुरू झाले. याला मोठा प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ८० लाख जणांना लसीचे डोस देण्यात आले. जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्येक दिवसाला लसींचे एक कोटी डोस लसीकरणासाठी उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. त्यानंतर लसीकरणाचा हा वेग आणखी वाढेल.

leave a reply