वायुसेना रशियाकडून ३३ लढाऊ विमाने खरेदी करणार

नवी दिल्ली – लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर १२ ‘सुखोई-३०एमकेआय’ आणि २१ ‘मिग-२९’ विमाने अशी एकूण ३३ लढाऊ विमाने रशियाकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव वायुसेनेने सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव सहा हजार कोटी रुपयांचा असून गेल्या काही काळापासून वायुसेना या योजनेवर काम करीत होती. मात्र या प्रस्तावासंदर्भांतील प्रक्रियेला आता वेग देण्यात आला आहे. पुढील आठवड्यात संरक्षण मंत्रालयाकडे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे वृत्त आहे.

वायुसेना, रशिया, लढाऊ विमाने

गेल्या १० ते १५ वर्षांत भारताने रशियाकडून २७१ ‘सुखोई-३०’ लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. मात्र काही ‘सुखोई-३०’ विमानांचा अपघात झाल्याने, या विमानांची जागा भरून काढण्यासाठी नवी १२ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच ‘मिग-२९’ विमाने देण्याचा प्रस्ताव रशियानेच भारतासमोर ठेवला होता. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील लढाऊ विमामांची कमतरता भरून काढता यावी यासाठी रशियाने ‘मिग-२९’ विमानांच्या विक्रीचा प्रस्ताव भारताला दिला होता. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात याधीपासून ‘मिग-२९’ विमाने आहेत. ‘मिग-२९’चे तीन स्क्वाड्रन सध्या भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात कार्यरत आहेत. त्यामुळे वायुसेना या लढाऊ विमानांशी चांगलीच परिचित आहे.

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आवश्यकतेपेक्षा १० स्क्वाड्रन कमी आहेत. विमानांची ही कमतरता भरून काढण्यासाठी वायुसेना आणि सरकार विविध प्रस्तावावर काम करीत आहे. फ्रान्सकडून ३६ राफायल विमाने खरेदी करण्यात येत आहेत. यातील चार विमान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात येतील. २० मे रोजी ही विमाने भारताला फ्रान्सकडून देण्यात येणार होती. मात्र कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे या विमाने भारताच्या हवाली करण्याची प्रक्रिया पुढे गेल्याचे सांगितले जाते.

चीनच्या भ्याड हल्ल्यात २० भारतीय सैनिकांना वीरमरण आल्यावर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. वायुसेना अलर्टवर आहे. नेमक्या या वेळेस वायुसेनेने रशियाकडून नव्या लढाऊ विमानांची खरेदी करण्याच्या प्रक्रियेला दिलेला वेग महत्वाचा ठरतो.

leave a reply