भारताच्या सैन्याचे ’नॉर्दर्न फ्रंटिअर’वर पूर्ण नियंत्रण

ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल कलिता

कोलकता – भारतीय लष्कराचे उत्तरेकडील सीमेवर पूर्णपणे नियंत्रण असल्याची ग्वाही ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी दिली. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील एलएसीवर चीनच्या लष्कराने घुसखोरीचा प्र्रयत्न केल्यानंतर, लेफ्टनंट जनरल कलिता यांनी दिलेली ही ग्वाही महत्त्वाची ठरते. तर 300 च्या संख्येने घुसखोरी करण्यासाठी आलेल्या चिनी जवानांची भारतीय सैनिकांनी अशी काही खोड मोडली की ते आपले साहित्य तिथेच टाकून पळून गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यांचे काही साहित्य भारतीय सैन्याच्या हाती लागल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.

Northern Frontier1971 सालच्या पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात 16 डिसेंबर रोजी भारताला फार मोठा विजय मिळाला आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती. त्यामुळे 16 डिसेंबर हा भारतात विजयदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात बोलताना ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी उत्तरेकडील सीमेवर भारतीय सैन्याचे पूर्ण नियंत्रण असल्याचे स्पष्ट केले. याआधी लष्करी अधिकारी तसेच संरक्षणमंत्र्यांनी संसदेत भारताची एक इंचभर भूमी देखील चीनच्या लष्कराला घेता आलेली नाही, असे जाहीर केले होते. उलट तवांग सेक्टरमधील एलएसीवरील परिस्थिती बदलू पाहणाऱ्या चीनच्या जवानांना इथून माघार घेण्यास भारतीय सैनिकांनी भाग पाडले होते, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले होते.

माजी लष्करी अधिकारी देखील चीनच्या कारवायांना भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचे सातत्याने सांगत आहेत. एका मुलाखतीत बोलताना भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी गलवानच्या संघर्षामुळे चीनची फार मोठी हानी झाली, असा दावा केला. भारतीय सैन्याने बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चीनला टक्कर दिली आणि यामुळे चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा गेल्याचा दावा केला आहे. शेजारी देशांना धमकावणाऱ्या चीनसमोर ठामपणे खडे राहता येऊ शकते, हे भारताने साऱ्या जगाला दाखवून दिले. यामुळे चीनच्या विरोधात भूमिका घेता येईल, असा विश्वास इतर देशांना वाटू लागला, असे माजी लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. एलएसीवर भारतीय सैन्याला चीनच्या विरोधात काटेरी हत्यारांचा वापर करावा लागतो, ही दुर्दैवाची बाब ठरते. भारताला 21 शतकातील सैन्य तयार करायचे आहे, ही बाब त्याच्याशी विसंगत आहे. पण बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चीनच्या लष्करावर गुंडासारखे वर्तन करण्याची वेळ आली, ही बाब अधिक दयनीय ठरते, अशी टीका नरवणे यांनी केली.

दरम्यान, सोशल मीडियावरून तवांगच्या एलएसीबाबतच्या निरनिराळी माहिती दिली जात आहे. तवांग सेक्टरमध्ये चीनच्या जवानांना मार खावा लागला, याच्या बातम्या तैवानच्या वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जात आहेत, असा दावा सोशल मीडियावरून केला जातो. याबरोबरच राजनैतिक आघाडीवर भारताला चीनच्या विरोधात मोठे यश मिळाल्याचा दावा केला जातो. अमेरिका आणि रशियासह इतर देश देखील घुसखोरी करणाऱ्या चीनला नाही, तर भारताला आपले समर्थन असल्याचे दाखवून देत आहेत. ही बाब भारताचा राजनैतिक प्रभाव वाढत चालल्याचे स्पष्ट करीत असून ही चीनबरोबरच पाकिस्तानसाठीही घातक बाब ठरते, असा दावा पाकिस्तानच्या काही विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply