भारतीय सैन्यदलांनी हायब्रीड युद्धासाठी सज्ज रहावे

- वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदौरिया

पूणे – आत्ताच्या काळातील युद्धक्षेत्र अत्यंत जटिल, गुंतागूंतीचे आणि एकाचवेळी अनेक आघाड्यांवर आव्हान देणारे असून यामुळे अत्यंत अनपेक्षित सुरक्षाविषयक परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच देशाच्या संरक्षणदलांना एकाचवेळी अनेक आघाड्यांवर हायब्रीड युद्धासाठी सज्ज रहावे लागेल, असा संदेश भारताचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी दिला आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी संरक्षणदलांच्या सामायिक प्रतिसादाची आवश्यकता असल्याचे सांगून यासाठी भारताने संरक्षणदलप्रमुख हे पद तयार केले आहे, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. याच्या एक दिवस आधी वायुसेनाप्रमुखांनी लडाखच्या ‘एलएसी’वर वायुसेना करीत असलेल्या सामर्थ्यप्रदर्शनामुळे चीनच्या आगळीकीचा धोका टळल्याचा दावा केला होता.

हायब्रीड युद्धासाठी सज्ज

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) पासिंग आऊट परेडच्या कार्यक्रमासाठी हजर असलेल्या वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी आगामी काळातील हायब्रीड युद्धासाठी सज्ज राहण्याचा संदेश कॅडेट्सना दिला. उद्याचे लष्करी अधिकारी म्हणून, जगभरातील राजकीय उलथापालथींचे थेट परिणाम आपल्या शेजारील देशांच्या सुरक्षा व्यवस्थेवर होतात, याची जाणीव तुम्हाला असायला हवी, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. त्याचबरोबर, भारताच्या संरक्षणदलांनी अनेक आघाड्यांवरुन उद्भवणार्‍या हायब्रीड धोक्यांचा सामना करण्यासाठीही सुसज्ज असले पाहिजे. यासाठी सर्वकाळ सर्व आघाड्यांवर सजगता, समर्पण, वचनबद्धता आणि त्याग तसेच नेतृत्वाची गरज असते. हेच तीनही संरक्षणदल आणि देशाला तुमच्याकडून अपेक्षित आहे, याची जाणीव वायुसेनाप्रमुखांनी करुन दिली.

यानंतर एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी संरक्षणदलप्रमुखांची नियुक्ती आणि संरक्षण व्यवहार विभागाची उभारणी ही देशाच्या संरक्षण सुधारणांच्या टप्प्यातील ऐतिहासिक घटना असल्याचे स्पष्ट केले. तर एक दिवस आधी वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी शेजारी देशांना भारताच्या वायुसेनेच्या सामर्थ्याची जाणीव करुन दिली. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारतीय वायुसेनेने केलेली आक्रमक तैनाती त्याचबरोबर लष्कराच्या तैनातीला सहाय्य करुन आपली सज्जता दाखवून दिली आहे’, असे वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले. भारतीय वायुसेनेची ही तैनाती आणि आक्रमक पवित्रा यांनी चीनला ‘एलएसी’वर भारतविरोधी कारवाया करण्यापासून परावृत्त केले, असे सूचक विधान भदौरिया यांनी केले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय वायुसेनेने ‘एलएसी’वर ‘सुखोई-३० एमकेआय’, ‘जॅग्वार’ व ‘मिराज २०००’ या विमानांची तैनाती केली असून रफायल आणि तेजस या विमानांनी देखील या क्षेत्रात हवाई गस्त घातल्या आहेत.

तसेच पाकिस्तानच्या बालाकोट येथे भारतीय वायुसेनेने चढविलेल्या हल्ल्याचा उल्लेखही एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी केला. यापुढे भारतात हल्ले चढविण्याआधी दहशतवादी संघटनांना बालाकोटवरील हल्ला आठवत राहील, असा टोला वायुसेनाप्रमुख यांनी लगावला.

leave a reply