अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन विजयी झाल्याचा माध्यमांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जोसेफ बिडेन विजयी झाल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात आला आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात, बिडेन यांना बहुमतासाठी आवश्यक असणारी ‘इलेक्टोरल कॉलेज’ची २७० हून अधिक मते मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक अद्याप संपली नसल्याचे सांगून, अमेरिकेतील कोणत्याही प्रांताने बिडेन विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिलेले नाही, याकडे लक्ष वेधले आहे.

बिडेन

३ नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान झाले होते. राष्ट्राध्यक्षपदाबरोबरच अमेरिकी संसदेच्या ‘सिनेट’ व ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’च्या जागांसाठीही मतदान झाले. कोरोना साथीच्या वाढत्या फैलावामुळे अनेक प्रांतातील मतदारांनी ‘अर्ली वोटिंग’ व ‘पोस्टल बॅलट’चा पर्याय स्वीकारल्याचे समोर आले होते. एकूण सुमारे १५ कोटी अमेरिकी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठ्या प्रमाणात झालेले मतदान व क्लिष्ट प्रक्रिया यामुळे अनेक प्रांतांमध्ये अद्यापही १०० टक्के मतमोजणी पूर्ण झालेली नाही. मात्र ९० टक्के अथवा त्याहून अधिक मतमोजणी झालेल्या प्रांतांनी संभाव्य विजेत्यांचे अंदाज जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्या आधारावर अमेरिकी प्रसारमाध्यमांनी, जो बिडेन यांना विजयासाठी आवश्यक असलेली २७०हून अधिक मते मिळाल्याचा दावा केला आहे. काही माध्यमांनी बिडेन यांना २७३ तर काहींनी २९० इलेक्टोरल मते मिळाल्याचे दावे केले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

बिडेन यांनी ‘प्रेसिडेंट इलेक्ट’ म्हणून निवेदन जारी केले असून, अमेरिकी जनतेचे आभार मानले आहेत. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, ही निवडणूक अद्याप संपली नसल्याचे सांगून, बिडेन चुकीच्या पद्धतीने स्वतःला विजयी झाल्याचे दाखविण्याची घाई करीत आहेत, असा आरोप केला आहे. जो बिडेन यांना कोणत्याही प्रांताने विजयाचे प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचेही यापूर्वीच सांगितले असून, सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. ट्रम्प यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेने काही प्रांतांमधील निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकाही दाखल केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचा अधिकृत निकाल अधिकच लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply