भारत ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचा संकल्प करा

- उद्योजकांना पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली – धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रात भारत कोणावरही अवलंबून नसेल, असा आत्मनिर्भर भारत जागतिक अर्थव्यवस्थेला आधार देणार असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आता ‘मेड इन इंडिया’ उत्पादने बनण्याची आवश्यकता आहे. मात्र ती ‘मेड फॉर द वर्ल्ड’ असायला हवीत असे सांगून याद्वारे येत्या काळात आयात कमी करून निर्यात वाढ करायला हवी, असा संदेश पंतप्रधानांनी उद्योग जगताला दिला .

India self-sufficient‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सीआयआय) या देशातील उद्योगांच्या प्रमुख संघटनेला १२५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान बोलत होते. ”जगातिक पुरवठा साखळीत (ग्लोबल सप्लाय चैन) भारताचा सहभाग भक्कम करेल अशी मजबूत स्थनिक पुरवठा साखळी उभारण्यासाठी गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. यासाठी भारतात उद्योग उभे राहायला हवेत. जागतिक शक्ती बनतील अशा सक्षम उद्योगांची निर्मिंती देशात व्हायला हवी”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

”कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करताना, त्याविरोधात लढताना सरकारने अर्थव्यस्थेलाही बळकटी देण्यासाठी पावले उचलीत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचा निर्णय दीर्घकालीन हित लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. कित्येक क्षेत्रे खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आली आहेत. देशातील साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करण्यावर जोर दिला जात आहे.”, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

देशाची क्षमता, कल्पकता, प्रतिभावान तरुण, शेतकरी आणि उद्योगांचे नेतृत्व यावर आपला पूर्ण विश्वास आहे. देशात उत्पादनाला, मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याकरिता सरकार काही क्षेत्रांकडे प्राथमिकतेने लक्ष पुरवीत आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

”आज जगात भारतावरील विश्वास वाढला आहे. भारतीय उद्योगांनी याचा लाभ उचलायला हवा. या आघाडीवर ‘सीआयआय’ सारख्या संघटनांनी जबाबदारी उचलायला हवी. उद्योजकांनी लक्ष साध्य करण्यासाठी पुढे यावे. उद्योजकांनी नव्या योजना, नव्या संकल्पना घेऊन आत्मविश्वासाने पुढे याव. सरकार त्यांना सर्वोतोपरी साहाय्य करील. आत्मनिर्भर भारतासाठी सरकार आपल्याबरोबर उभे आहे. उद्योजकांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प करावा आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार पूर्ण ताकद लावेल. आपण दोन पावले चालाल, तर सरकार चार पावले पुढे येईल”, अशी ग्वाही देताना पंतप्रधानांनी उद्योजकांना गुंतवणुकी वाढविण्याचे आवाहन केले.

leave a reply