भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने पुर्वपदावर येत आहे

- 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'चा दावा

नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने रुळावर येत असल्याचा दावा जागतिक ख्यातीची अमेरिकी संस्था ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ने केला आहे. त्याचवेळी परकीय गुंतवणूकदारांनी (एफपीआयज्) नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १३ दिवसात भारतात ३५ हजार १०९ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

भारतीय अर्थव्यस्थेबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. कोरोनाचे संकट मागे सोडून भारतीय अर्थव्यवस्था पुर्वपदावर येत असल्याचे दावे विविध अहवालात करण्यात येत आहेत. नुकताच ‘मूडीज्’कडून भारताच्या विकास दराच्या अंदाजात बदल करण्यात आला होता. सरकारनेही ‘जीएसटी’ महसूलात झालेली वाढ, लॉकडाऊनपूर्वी असणारी इंधनाची मागणी निर्माण झाल्यावर अर्थव्यवस्थेने पूर्वीप्रमाणे वेग पकडल्याचा दावा केला होता.

आता ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ने सुद्धा असेच निरीक्षण नोंदवले आहे. जगातिक स्तरावर अर्थव्यवस्थांबाबत अंदाज वर्तविणाऱ्या या संस्थेने भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने पूर्वपदावर येत असल्याचा दावा केला आहे. तसेच यावर्षीच्या चौथ्या तिमाहीत महागाई दर घसरून ६ टक्क्यांवर येईल, असा अंदाज ‘ऑक्सफर्ड इकोनॉमिक्स’कडून वर्तविण्यात आला आहे.

यामुळे रिझर्व्ह बँक (आरबीआय) व्याजदरात दाखवत असलेली मृदुता सोडून देईल. मात्र डिसेंबर महिन्यात पतधोरणात आरबीआय आपला व्याजदरात बदल करणार नाही, अशी शक्यताही या अहवालात वर्तविण्यात आली आहे. त्याचवेळी पुढील वर्षी चालनफुगवट्याच्या बाबतीत भारताला अधिक सतर्कता बाळगावी लागेल, असा इशाराही ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ने दिला आहे.

दरम्यान, परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवल्याचे नोव्हेंबर महिन्यात ‘एफपीआयज्’ने केलेल्या गुंतवणूकीवरून स्पष्ट होत आहे. ‘एफपीआयज्’नी भारतीय बाजारात २ ते १३ नोव्हेंबर दरम्यान तब्बल ३५ हजार १०९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामधील २९ हजार ४३६ कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर्समध्ये करण्यात आली आहे, तर ५ हजार ६७३ कोटी रुपयांची गुंतवणूक कर्जरोख्यात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ‘एफपीआयज्’ने भारतात शेअर्समध्ये २२ हजार ३३ कोटी रुपये गुंतवले होते.

सरकारने राबवलेल्या सुधारणा, भारतीय कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल यामुळे गुतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. भारतीय बाजारात चांगले संकेत दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास वाढल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply