पंतप्रधानांची जैसलमेर भेट शत्रूला संदेश देणारी ठरली

- लष्करी विश्लेषक व माजी लष्करी अधिकार्‍यांचा निष्कर्ष

गुरूग्राम – १९७१ सालच्या युद्धातील पाकिस्तानी लष्कराच्या दारूण पराभवाचे स्मारक असलेल्या लोंगेवाला पोस्टला पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या भेटीनंतर त्याचे फार मोठे पडसाद उमटू लागले आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी लष्करी पेहरावात व रणगाड्यावर बसून केलेली पाहणी म्हणजे भारत मोठ्या कारवाईची तयारी करीत असल्याची चिंता पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी व्यक्त करू लागले आहेत. तर भारतीय पंतप्रधानांच्या या भेटीने शत्रूला योग्य तो संदेश मिळल्याचे भारताचे माजी लष्करी अधिकारी ठासून सांगत आहेत.

सलग सातव्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने सीमेवर तैनात सैनिकांची भेट घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र यांच्या धोरणाचे लष्करी विश्लेषक व माजी लष्करी अधिकार्‍यांनी स्वागत केले आहे. या भेटीमुळे भारतीय सैनिकांचे मनोधैर्य उंचाविण्यास मदत मिळत असल्याचे लष्करी विश्लेषक सतीश दुआ यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या भेटीने देशाच्या शत्रूंना योग्य तो संदेश दिला जात असल्याचा दावा एस. पी. सिन्हा या लष्करी विश्लेषकाने केला. तर सणासुदीच्या काळात घरापासून दूर सीमेवर तैनात असलेले सैनिक एकटे नसून सारा देश त्यांच्यासोबत असल्याचा संदेश पंतप्रधान मोदी यांनी जैसलमेरच्या भेटीतून दिल्याचे माजी लष्करी अधिकरी मेजर जनरल जी. डी. बक्शी यांनी सांगितले.

तर पंतप्रधान मोदी यांनी यंदाच्या भेटीसाठी लोंगेवाला पोस्टची केलेली निवड पाकिस्तानसाठी इशारा असल्याची चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत. १९७१ साली भारत-पाकिस्तानात लोंगेवाला येथे घनघोर युद्ध झाले होते. भारताच्या १२० सैनिकांच्या पथकाने पाकिस्तानच्या टँक रेजिमेंटला सळो की पळो करुन सोडले होते. अशा या ऐतिहासिक लष्करी पोस्टला भेट देऊन पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचे या देशातील माध्यमांचे म्हणणे आहे. येत्या काळात भारतीय लष्कर काही तरी मोठे करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत भारतीय पंतप्रधानांच्या या भेटीतून मिळत असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. यासाठी नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या संघर्षाकडे पाकिस्तानी पत्रकार लक्ष वेधत आहेत.

leave a reply