भारतीय अर्थव्यवस्था झेप घेण्याच्या तयारीत

- जागतिक बँकेचा विश्‍वास

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – भारतीय अर्थव्यवस्था या वित्तीय वर्षात सुमारे ७.५ ते १२.५ टक्के इतक्या विकासदराने प्रगती करू शकेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. कोरोनाच्या साथीमुळे आलेली मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था झेप घेण्याच्या तयारीत आहे, असा दावा जागतिक बँकेने केला. याबरोबरच २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशात येणारी ‘फॉरिन पोर्टफोलिओ इन्व्हेंस्टमेंट’ (एफपीआय) तब्बल २.६ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेल्याची बातमी आली आहे. ही विदेशी संस्थागत गुंतवणूक वाढणे याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेवरील परदेशी गुंतवणूकदारांचा विश्‍वास अधिक दृढ होणे असा होतो. त्यामुळे जागतिक बँकेने भारताच्या आर्थिक कामगिरीबाबत व्यक्त केलेला विश्‍वास अधिकच महत्त्वाचा ठरतो आहे.

Advertisement

वर्षभरापूर्वीची परिस्थिती लक्षात घेतली, तर भारताची आत्ताची आर्थिक कामगिरी जबरदस्त असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोरोनाच्या साथीमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे मंदी आली होती आणि भारताचे अर्थव्यवहार सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घसरले होते. या साथीबाबतची धास्ती तसेच लसीबाबतची अनिश्‍चितता यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसली होती. मात्र आत्ताची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेत आहे. या देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची मोहीम जोर पकडत आहे. त्याच्या बरोबरीने भारताच्या अर्थव्यवहारालाही गती मिळू लागली आहे, असे जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख अर्थतज्ज्ञ हॅन्स टिमर यांनी म्हटले आहे. असे असले तरी अजूनही परिस्थिती आव्हानात्मक आहे, याकडेही टिमर यांनी लक्ष वेधले.

२०२१-२२ या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सुमारे ७.५ ते १२.५ टक्के दरम्यानच्या विकासदराने प्रगती करील. कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या मोहीमेवरही बरेच काही अवलंबून असेल. तसेच जागतिक अर्थव्यवस्था किती वेगाने पूर्वपदावर येईल, यावरही भारताच्या प्रगतीचा वेग ठरेल, असे टिमर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, टिमर यांच्याकडून भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा विश्‍वास व्यक्त केला जात असताना, याला दुजोरा देणारी बातमी समोर आली आहे. भारतात २०२०-२१ या आर्थिक वर्षात २.६ लाख कोटी रुपयांची ‘फॉरिन पोर्टफोलिओ इन्व्हेंस्टमेंट’ (एफपीआय) अर्थात विदेशी संस्थागत गुंतवणूक आली आहे.

विदेशी वित्तसंस्थांनी भारतात केलेली ही २.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. यामुळे गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेवर दाखवित असलेला विश्‍वास जगजाहीर झाला आहे, असा दावा केला जातो. कुठल्याही देशात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणि ‘फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेंस्टमेंट’ (एफपीआय) या दोन मार्गांने विदेशी गुंतवणूक येत असते. ‘एफपीआय’द्वारे केली जाणारी गुंतवणूक ही प्रमुख्याने शेअर्स आणि बॉण्ड अर्थात रोख्यांमध्ये होते. बुधवारी २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाची अखेर होती. या संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण २ लाख, ७४ हजार ५०३ कोटी रुपयांचा ‘एफपीआय’ भारतात आली. त्याचवेळी परकीय वित्तसंस्थांनी २४ हजार ७० कोटी रुपये बॉण्ड बाजारातून काढले असून याच काळात इतर विभागात १० हजार २३८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अशा रितीने आर्थिक वर्षात २.६ लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक देशात झाली आहे.

याआधी २०१२-१३ सालात ‘एफपीआय’द्वारे भारतात १.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. हा आतापर्यंतचा विक्रम होता. मात्र यावर्षी सदर आघाडीवर नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. २०२१-२२ मध्ये देशात होणार्‍या गुंतवणुकीत अधिक वाढ होईल, असा विश्‍वास काही अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

leave a reply