भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे

- केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल

अर्थव्यवस्था पूर्वपदावरनवी दिल्ली – निर्यातीत वाढ आणि देशात होणार्‍या थेट परकीय गुंतवणुकीचा वाढता ओघ, हे सारे भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती देऊन देशाची अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट मागे टाकून सुरळीत होत असल्याचा निर्वाळा दिला. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था देखील भारत सर्वाधिक वेगाने प्रगती करील, असा विश्‍वास व्यक्त करीत आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देखील भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या काळात दमदार कामगिरी बजाविल, असा विश्‍वास व्यक्त केला होता.

गेल्या वर्षी या महिन्याच्या तुलनेत यावर्षी रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्याचे दिसत आहे. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंतच्या काळात व्यापारी पातळीवरील निर्यात तब्बल २३२ अब्ज डॉलर्सवर गेली असून या वित्तीय वर्षाच्या पहिल्या चार महिन्यातच थेट परकीय गुंतवणूक तब्बल ६२ टक्क्यांनी वाढलेली आहे. हे सारे, भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत देत आहे. आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्र भारतावर अधिक विश्‍वास व्यक्त करीत आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार देखील भारतात गुंतवणुकीसाठी उत्सूक आहेत.

पुढच्या काळात याचे फार मोठे सकारात्मक परिणाम समोर येतील, असा विश्‍वास केंद्रीय व्यापारमंत्र्यांच्या विधानातून प्रतित होत आहे. कोरोनाच्या साथीमुळे विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांनाही फार मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. या धक्क्यातून विकसित व औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था अजूनही पूर्णपणे सावरलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत, भारतीय अर्थव्यवस्था सकारात्मक संकेत देत आहे, ही फार मोठी समाधानकारक बाब ठरते. विशेषत: जगाची फॅक्टरी मानल्या जाणार्‍या चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर खड्या ठाकलेल्या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर, भारताची ही आर्थिक कामगिरी ठळकपणे जगासमोर येत आहे. यामुळे जागतिक उत्पादनाचे केंद्र असलेल्या चीनमधून काढता पाय घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्या आपले कारखाने इतरत्र वळविण्यासाठी हालचाली करीत आहेत. या बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर भारत हा उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. फार मोठी बाजारपेठ व कुशल मनुष्यबळ, लोकशाहीवादी व्यवस्था ही भारताची बलस्थाने असून भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारताकडे आकर्षित करीत आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावरत्याबरोबरच कोरोनाची साथ असताना, भारताने केलेली कामगिरी हा सार्‍या जगाच्या कौतूकाचा विषय बनला होता. भारतात कोरोनाच्या लसींची निर्मिती व त्याचे प्रचंड प्रमाणात केले जाणारे उत्पादन तसेच लसीकरणाची व्यापक मोहीम हे सारे विकसित देशांनाही थक्क करणारे होते. याचा फार मोठा परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर झाला असून नुकत्याच इटलीमध्ये पार पडलेल्या जी२०च्या बैठकीत त्याचे प्रतिबिंब उमटले होते.

भारतीय अर्थव्यवस्था नजिकच्या काळात मोठ्या वेगाने प्रगती करणार असून त्याचा फार मोठा लाभ जागतिक अर्थव्यवस्थेला मिळणार असल्याचे दावे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था करीत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अपेक्षित असलेल्या आर्थिक सुधारणा घडविण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत होत आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी संकटात सापडलेली असताना, भारताच्या निर्यातीत झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा भारतात येणारा ओघ, हे सारे भारताच्या आर्थिक सुधारणांना मिळत असलेल्या प्रतिसादाचे संकेत देत आहेत. केंद्रीय व्यापारमंत्र्यांनी याचा दाखला दिल्याचे दिसत आहे.

leave a reply