पाश्‍चात्यांच्या रशियाविरोधी कारवायांना तीव्र प्रत्युत्तर देऊ

- रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

मॉस्को/लंडन – पाश्‍चात्य देशांकडून सुरू असणार्‍या शत्रुत्त्वाच्या कारवायांना त्याच पद्धतीने आणि गरज पडल्यास अधिक तीव्र व वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. यावेळी रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी नाटोकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर हालचालींवरही टीकास्त्र सोडले. गेल्या काही महिन्यात रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव सातत्याने चिघळत असून दोन्ही बाजूंनी आक्रमक हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून देण्यात आलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

गेल्या काही महिन्यात रशियाकडून युक्रेन सीमेनजिक मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू आहेत. युक्रेनवरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी व तणाव निर्माण करण्यासाठी रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ ९० हजार जवान तैनात केल्याचा आरोप युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात केला होता. फक्त भूसीमाच नाही तर ब्लॅक सी सागरी क्षेत्रातही रशियन युद्धनौकांच्या हालचाली वाढल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशिया युक्रेनवर आक्रमण करु शकतो, असे बजावले होते.

रशियाने हे दावे स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत. मात्र त्याचवेळी पाश्‍चात्य देशांकडून सुरू असलेल्या हालचालींना प्रत्युत्तर देण्याची तयारीही ठेवल्याचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले आहे. ‘रशियाची भूमिका अत्यंत संयमी असून ती कायम राहिल, असे आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे. रशियाकडून कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण करण्यात आलेला नाही. मात्र पाश्‍चात्य देशांकडून शत्रुत्त्वाच्या भावनेने कारवाया सुरू आहेत. या कारवायांना आम्ही जशास तसे पद्धतीने उत्तर देऊ आणि आवश्यकता भासलीच तर अधिक कठोर व वेगळ्या पद्धतीनेही प्रत्युत्तर दिले जाईल’, असा इशारा रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह फ्रान्सच्या भेटीवर असून यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी रशिया व युरोपिय महासंघामधील संबंध सुरळीत करण्यासाठी फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचीही माहिती दिली.

दरम्यान, युक्रेन व बेलारुसच्या मुद्यावरून रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव अधिक चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. रशियाने बेलारुसबरोबर संयुक्त लष्करी सराव सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या सरावादरम्यान रशियाने बेलारुसमध्ये पॅराट्रुपर्सचे पथक उतरविल्याचे उघड झाले. रशियाने आपली काही लष्करी पथके व संरक्षणयंत्रणाही बेलारुसमध्ये तैनात केल्याचे दावे समोर आले आहेत. रशियाकडून लढाऊ विमाने व बॉम्बर्सच्या फेर्‍याही वाढल्या आहेत.

रशियाने शुक्रवारी ब्रिटननजिकच्या ‘नॉर्थ सी’ क्षेत्रात दोनदा बॉम्बर्स विमाने धाडल्याची घटना समोर आली. या बॉम्बर्सना पिटाळण्यासाठी ब्रिटनने आपली लढाऊ विमाने तैनात केल्याची माहिती ब्रिटीश हवाईदलाने दिली. युक्रेन सीमा तसेच बेलारुस-पोलंड सीमेवरील तणाव वाढला असताना रशियाने आपली बॉम्बर्स युरोपिय देशांच्या हद्दीनजिक पाठविणे लक्ष वेधून घेणारी घटना ठरते. या घटनेपूर्वी रशिया तसेच नाटोची विमाने परस्परांच्या हद्दीनजिक येण्याच्या दोन घटना या आठवड्यात घडल्या आहेत. रशियाच्या युद्धनौका ब्लॅक सीमधील अमेरिकी युद्धनौकांची टेहळणी करीत असल्याचेही उघड झाले आहे.

leave a reply