भारताची माध्यमे पाकिस्तानची खिल्ली उडवित आहेत

- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद – पाकिस्तानची अवस्था पाहून भारताच्या वृत्तवाहिन्या खिल्ली उडवित आहेत, असे सांगून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यावर खंत व्यक्त केली. या स्थितीला पाकिस्तानचे सध्याचे राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप देखील इम्रान खान यांनी केला. त्यांच्या या आरोपांना पाकिस्तानातूनच प्रत्युत्तर आले आहे. भारतीय माध्यमे केवळ पाकिस्तानचीच नाही तर पाकिस्तानी नेत्यांचीही खिल्ली उडवत आहेत आणि त्यामध्ये इम्रान खान यांचाही समावेश असल्याचे काही पत्रकारांनी लक्षात आणून दिले आहे.

भारताची माध्यमे पाकिस्तानची खिल्ली उडवित आहेत - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानशक्य आहे त्या प्रत्येक देशाकडून पाकिस्तान भीक मागत असल्याची बाब एकदा नाही, तर अनेकदा समोर आली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून एक अब्ज डॉलर्सचा निधी मिळावा, म्हणून पाकिस्तान शर्थीचे प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वी चीनने पाकिस्तानला ७० कोटी डॉलर्सचे सहाय्य जाहीर केले होते. त्यावर पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. पण इतक्या तुटपुंज्या रक्कमेने पाकिस्तानचे काही होणार नाही, हे या देशातील विश्लेषकांनी लक्षात आणून दिले होते. अशा उथळ नेत्यांमुळेच पाकिस्तानची ही अवस्था झालेली आहे, अशी हताश प्रतिक्रिया या देशातील बुद्धिमंत व्यक्त करीत आहेत.

अशा परिस्थितीत इम्रान खान यांनी रविवारी पाकिस्तानच्या सरकारवर हल्ला चढविला. पाकिस्तानची सध्याची अवस्था पाहून भारतीय माध्यमे आपल्यावर हसत आहेत. पाकिस्तान स्वतःहून स्वतःला बरबाद करीत आहे आणि त्यासाठी कुणालाही काहीही करण्याची आवश्यकत नाही, असे सांगून भारतीय माध्यमे आपल्या देशाची खिल्ली उडवित असल्याचा ठपका इम्रान खान यांनी ठेवला. पाकिस्तान यापुढे स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही, या देशाला पुन्हा भारतात विलीन व्हावेच लागेल, असे दावे भारतीय नेते करू लागले आहेत. यासाठी आपण पाकिस्तानची निर्मिती केली होती का? असा सवाल इम्रान खान यांनी केला.

पाकिस्तानने आपल्या बचावासाठी फार मोठी फौज पोसली. या फौजेने पाकिस्तानचे रक्षण देखील केले. पण आजची वेळ भ्रष्ट नेत्यांमुळे पाकिस्तानवर ओढावली आहे. या नेत्यांच्या पाकिस्तानात आणि दुसऱ्या देशात प्रचंड प्रमाणात संपत्ती व मालमत्ता असल्याचे इम्रान खान म्हणाले. सध्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असले तरी इम्रान खान देखील या भ्रष्टाचाराच्या आरोपापासून स्वतःला वेगळे ठेवू शकले नव्हते. त्यांच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरू असून या प्रकरणी इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सरकारवर केलेली टीका अपेक्षित मानली जाते. मात्र ही टीका करताना त्यांनी भारताचा वापर करून आपल्या विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, ही लक्षणीय बाब ठरते.

हिंदी

 

leave a reply