नागरिकांची हत्या घडविणार्‍या जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले

नवी दिल्ली – गेल्या महिन्यात जम्मू व काश्मीरमधील नागरिकांची हत्या घडविणार्‍या जवळपास सर्वच दहशतवाद्यांना संपविण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले. यानंतर सर्वसामान्यांना लक्ष्य करणार्‍या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी गोपनीय माहितीच्या आधारे ‘सर्जिकल ऑपरेशन्स’ राबविण्याची तयारी सुरक्षा दलांनी केली आहे. गुप्तचर संस्था, जम्मू व काश्मीरचे पोलीस दल, लष्कर यांच्या समन्वयाने छोट्या पथकांद्वारे या मोहिमा फत्ते केल्या जातील. यासाठी स्थानिकांनाही विश्‍वासात घेतले जाईल. यामुळे दहशतवाद्यांना संपविताना सुरक्षा दलांना कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करावी लागणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागरिकांची हत्या घडविणार्‍या जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी मेहरान यासिन शाला याने श्रीनगरमध्ये दोन शिक्षकांचा बळी घेतला होता. २४ नोव्हेंबर रोजी या हत्या घडविणार्‍या मेहरान यासिन शाला याला सुरक्षा दलांनी ठार केले. तर गेल्या महिन्यात अदिल वाणी या दहशतवाद्याने बेछूट गोळीबार करून दोघांची हत्या केली होती. २० ऑक्टोबर रोजीच शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अदिल वाणी याला सुरक्षा दलांनी संपविले. १७ ऑक्टोबर रोजी कुलगाम येथे दहशतवादी गुलजार अहमद रेशी याने दोन बिहारी मजुरांसह एका स्थानिकाचा बळी घेतला होता. याला तीन दिवस उलटल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गुलजार रेशी याला ठार केले.

अशारितीने जम्मू व काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करणार्‍या जवळपास सर्वच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले. मात्र दहशतवाद्यांनी आपले डावपेच बदलल्याने, पुढच्या काळात दहशतवाद्यांना संपविण्यासाठी वेगळ्या तंत्राचा वापर करण्याची तयारी सुरक्षा दलांनी केली आहे. कित्येकदा दहशतवादी नागरी वस्त्यांमध्ये दबा धरून बसतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई केल्यास फार मोठी मनुष्यहानी सहन करावी लागू शकते. याचा विचार करून सुरक्षा दलांनी काही वेळेस दहशतवाद्यांवर कारवाई न करता त्यांना पळून जाण्याची संधी दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जम्मू व काश्मीरमधील आपल्या हस्तकांना पाकिस्तानने दहशतवादी कारवाया करताना अधिकाधिक बळी घेऊन भारतीय यंत्रणेवरील दडपण वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. एका ठिकाणी दहशतवादी कारवाई केल्यानंतर त्यात कमीत कमी दहा जणांचे बळी जायलाच हवेत, असे दहशतवाद्यांना त्यांच्या पाकिस्तानी म्होरक्यांनी बजावले होते. हा कट यशस्वी होऊ नये, यासाठी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस, लष्कराच्या छोट्या पथकांद्वारे ‘सर्जिकल ऑपरेशन्स’ करण्याची तयारी सुरक्षा दलांनी केली आहे. यामध्ये स्थानिकांनाही विश्‍वासात घेऊन त्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

आधीच्या काळात पाकिस्तानकडून केल्या जाणार्‍या भारतद्वेष्ट्या अपप्रचाराला बळी न पडता जम्मू व काश्मीरचे स्थानिक सुरक्षा दलांना दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहाय्य करीत आले आहेत. त्याचे परिणाम दिसू लागले असून पुढच्या काळात हे सहाय्य वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे फारशी जोखीम न पत्करता दहशतवाद्यांचा काटा काढणे सुरक्षा दलांना सोपे जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद संपविण्यासाठी ही उपाययोजना अतिशय प्रभावी ठरू शकते, असा दावा केला जातो.

leave a reply