जागतिक आरोग्य संघटना चीनच्या बाजूने पक्षपात करीत आहे

कोरोनाव्हायरस व त्यासाठीची माहिती, चिन्हे दडवून ठेवली, म्हणूनच जगावर हे संकट कोसळले. या संकटाला चीनच जबाबदार आहे,  असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना  चीनच्या बाजूने पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही चीनधार्जिणी भूमिका  अन्यायकारक असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला आहे.

अमेरिकन ‘हाऊस फॉरेन रिलेशन्स कमिटी’चे वरिष्ठ सदस्य मायकल मेकॉल यांनी जागतिक आरोग्य संघटना चीनची बाजू घेत असल्याचा गंभीर आरोप केला. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ‘टेड्रॉस घेब्रेस्यूएस’ यांचे चीनच्या राजवटीबरोबर जूने सहकार्य असल्याचे मेकॉल यांनी लक्षात आणून दिले. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेकॉल यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देणारी भूमिका घेतली. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना चीनच्या बाजूने पक्षपात करीत असल्याचे म्हटले आहे

थेट उल्लेख केला नसला, तरी जागतिक आरोग्य संघटना यासाठीचे उगमस्थान असलेल्या चीनवर याची जबाबदारी टाकायला तयार नाही. उलट चीनची बाजू घेण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा प्रयत्न राहिला आहे, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अप्रत्यक्षपणे सुचवीत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेल्या या भूमिकेचे जागतिक आरोग्य संघटनेवर फार मोठे दडपण येऊ शकते.

याआधीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी  कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘चिनी व्हायरस’ असा करून या संकटाला चीनच जबाबदार असल्याचा संदेश साऱ्या जगाला दिला होता. पुढच्या काळात या संदर्भातील अमेरिकेची भूमिका अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच चीनची बाजू उचलून धरणाऱ्यांची ही अमेरिका यापुढे गय करणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या  विधानांवरून स्पष्ट होत आहे.

leave a reply