अणुकरारापेक्षा इराणमधील निदर्शनांना समर्थन द्या

- जर्मनीच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्यांचे आवाहन

निदर्शनांना समर्थनबर्लिन/वॉशिंग्टन – अणुकरारासाठी वाटाघाटी करण्यापेक्षा इराणमधील मानवाधिकारांसाठी सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांना समर्थन द्या. या निदर्शकांवर कारवाई करणाऱ्या इराणच्या राजवटीवर कठोर निर्बंध लादा, असे आवाहन जर्मनीचे माजी राजनैतिक अधिकारी वोल्फगँग इशिंगर यांनी केले.

अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणबरोबर अणुकरारासाठी सुरू केलेल्या वाटाघाटी अजिबात पुढे नेऊ नये. अणुकराराद्वारे इराणला सवलत दिल्यास ती सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्यांसाठी चपराक ठरेल. त्यापेक्षा पाश्चिमात्य देशांनी अणुकराराचा नाद सोडून निदर्शकांना पाठिंबा घोषित करावा. त्याचबरोबर युरोपिय महासंघाने अणुकराराची पर्वा न करता इराणवर निर्बंध लादावे, अशी मागणी इशिंगर यांनी स्थानिक वर्तमानपत्राबरोबरच्या मुलाखतीत केली.

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्या उपस्थितीत वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या बैठकीतही इराणविरोधी कारवाईसाठी आवाहन करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये ७०० हून अधिक जणांचा बळी गेला तर ३० हजारांहून अधिक जणांना अटक झाल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.

leave a reply