चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाचा अंदमान-निकोबारमध्ये युद्धाभ्यास

अंदमान-निकोबार – चीन सीमेवरील तणाव अद्याप निवळला नसतानाच भारताने सर्व बाजूंनी चीनवरील दडपण वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी साऊथ चायना सीच्या मुद्द्यावरून चीनला फटकारल्यानंतर, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आपला प्रभाव दाखविण्यासाठी भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटांजवळ व्यापक युद्धाभ्यास सुरू केला आहे. साऊथ चायना सीमध्ये अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका पुन्हा दाखल झाल्या असतानाच भारतीय नौदलाने सुरू केलेल्या या सरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारतीय नौदलाच्या ‘ईस्टर्न नेव्हल कमांड’ व ‘अंदमान अँड निकोबार कमांड’चा भाग असलेल्या युद्धनौका, पाणबुड्या, लढाऊ विमाने, टेहळणी विमाने यांच्यासह हजारो सैनिक युद्धाभ्यासात सहभागी झाले आहेत. भारतीय नौदलाच्या ‘ईस्टर्न नेव्हल फ्लीट’चे प्रमुख रिअर ॲडमिरल संजय वात्सायन यांच्या नेतृत्वाखाली हा सराव चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय नौदलाने मलाक्काच्या आखातात तैनात केलेल्या काही युद्धनौकाही या सरावात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. ‘अंदमान अँड निकोबार कमांड’ हे भारतीय संरक्षणदलातील एकमेव ‘थिएटर कमांड’ असून या कमांडमध्ये लष्कर, नौदल व हवाई दलासह तटरक्षक दलाचाही समावेश आहे.

चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाचा अंदमान-निकोबारमध्ये युद्धाभ्यासभारतीय नौदलाचा युद्धाभ्यास सुरू असणारे क्षेत्र चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. चीनचा बहुतांश व्यापार मलाक्काचे आखात व हिंदी महासागरातून होणाऱ्या सागरी वाहतुकीवर अवलंबून आहे. हा मार्ग रोखला गेल्यास चीनचा व्यापार तसेच इंधन आयातीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे चीनकडून गेल्या दशकभरापासून हिंदी महासागरातील तैनाती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बांगलादेश, म्यानमार व श्रीलंका या देशांमधील बंदरांचा तळ म्हणून वापर करण्याचा चीनचा प्रयत्न सध्यातरी फसल्याचे दिसत आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या पाणबुड्या हिंदी महासागर क्षेत्रात धोकादायकरित्या वावरत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींना वेसण घालण्यासाठी भारताने आपले नौदल सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. अमेरिका व जपानसारख्या देशांबरोबर संयुक्त नौदल सरावातून भारताने आपली ही ताकद वारंवार दाखवून दिली आहे. नवा युद्धाभ्यास नौदल सामर्थ्याच्या प्रदर्शनाबरोबरच चीनला त्याच्या कारवायांवरून कडक इशारा देण्याचा प्रयत्न आहे.

गेले काही महिने सातत्याने भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रयत्न चालविले आहेत. जून महिन्यात गलवान व्हॅलीत केलेला असाच एक प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावला. गलवान व्हॅलीत भारताने दिलेल्या दणक्यानंतरही लडाख व इतर भागात चीनकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनातीच्या हालचाली सुरू आहेत. या मुद्द्यावर भारताने आक्रमक भूमिका घेतली असून चीनकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिण्यात येत आहे. चीनवरील दडपण कायम ठेवण्यासाठी भारताने इतर मार्गांनी हालचाली सुरू केल्या असून अंदमान आणि निकोबार बेटांजवळ सुरू केलेला व्यापक युद्धाभ्यास त्याचाच भाग असल्याचे मानले जाते.

भारताकडून सुरू असणाऱ्या या युद्धाभ्यासाला अमेरिका व चीनमध्ये ‘साऊथ चायना सी’ वरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमी आहे. ‘साऊथ चायना सी’ हा मुक्त इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्राचा भाग असल्याचे सांगून अमेरिकेने त्यावरील चीनचे सर्व दावे धुडकावले आहेत. त्याचवेळी अमेरिकेने आपली तैनाती व सरावाचे प्रमाण वाढविले असून सध्या दोन विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्ये सक्रिय आहेत. अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौका व त्यांच्या बरोबरीने ‘कॅरिअर ग्रुप’ साऊथ चायना सीमध्ये तैनात करण्याची गेल्या १५ दिवसांमध्ये ही दुसरी वेळ आहे. अमेरिकेने ‘युएसएस निमित्झ’ व ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ या विमानवाहू युद्धनौका चीननजीकच्या सागरी क्षेत्रात तैनात केल्या आहेत.

leave a reply