इंडियन ऑईल १० हजार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार

नवी दिल्ली – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड देशभरात (आयओसी) १० हजार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. कंपनीने याबाबतची घोषणा केली. येत्या तीन वर्षात ही चार्जिंग स्टेशन उभारली जातील. सरकार ई-वाहनांना अधिकाधिक प्रोत्साहन देत आहे. मात्र चार्जिंग स्टेशनची कमतरता हे देशात ईलेक्ट्रिक वाहन क्षेत्राच्या विस्तारासाठी मारक ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर इंडियन ऑईलने केलेली ही घोषणा अतिशय महत्त्वाची ठरते.

इंडियन ऑईल १० हजार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणारपेट्रोल, डिझेल सारख्या आयात कराव्या लागणार्‍या इंधनावरील निर्भरता कमी करून स्वस्त पर्याय म्हणून ई-वाहनांना सरकार प्रोत्साहित करीत आहे. मात्र ई-वाहनांना प्रोत्साहन देताना भारतात अजून यासाठीच्या पयाभूत सुविधा उभ्या राहिलेल्या नाहीत. चार्जिंग स्टेशन ठिकठिकाणी असणे हे सर्वात महत्वाचे ठरते. मात्र सध्या देशात चार्जिंग स्टेशनचे जाळे नाही. त्यामुळे ई-वाहन क्षेत्राच्या वाढीत ही बाब अडथळ्याची ठरत आहे.

इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस.एम.वैद्य यांनी या आघाडीवर कंपनीने मोठी योजना आखल्याची घोषणा केली. देशाभरात येत्या तीन वर्षात १० हजार चार्जिंग स्टेशन इंडियन ऑईलकडून उभारली जाणार आहेत. यातील दोन हजार स्टेशन्स येत्या १२ महिन्यात उभारली जातील. तर ८ हजार चार्जिंग स्टेेशन्स ही पुढील दोन वर्षांत उभारण्यात येतील, अशी कंपनीने घोषणा केली आहे.

एका अहवालानुसार भारताला २०२६ सालापर्यंत ४ लाख चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासेल. पुढील काळात टेसला सारख्या कंपन्या भारतात येणार असून ई-वाहनांकरीता पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल. टाटा कंपनी मोठ्या प्रमाणावर ई-वाहने बजारात आणत आहे. गेल्याच आठवड्यात टाटाने एकाच दिवशी २२ प्रवासी वाहनांच्या आवृत्त्या बाजारात आणल्या. यामध्ये ईलेक्ट्रिक बसचा समावेश होता.

leave a reply