पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद

- भारताकडून जोरदार प्रत्यूत्तर

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहिद झाला आहे. पाकिस्तान लष्कराच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून यात पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले आहेत. तसेच पाकिस्तानची एक चौकी नष्ट करण्यात आली. या महिन्यात पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यत भारताचे चार जवान शहीद झाले आहेत.

Pakistan_TerrorAttackपाकिस्तानी लष्कराने सुरुवातीस पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सकाळी ५.३० वाजता राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यात हवालदार दीपक कार्की शहीद झाल्याचे लष्कराचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद म्हणाले. हवालदार दिपक कार्की शूर अत्यंत प्रामाणिक सैनिक होते. त्यांचे सर्वोच्च बलिदान आणि निष्ठा देश कधीही विसरणार नाही असे कर्नल देवेंद्र आनंद म्हणाले.

पाकिस्तानच्या या चिथावणीखोर गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानची एक चौकी नष्ट केली. यामध्ये पाकिस्तानचे दोन जवान ठार झाल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये कित्येक दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहाय्य करण्याकरिता पाकिस्तानकडून हा गोळीबार सुरु असून भारत आणि चीनमध्ये लडाखच्या सीमेवर तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराची तीव्रताही वाढली आहे. मात्र भारताकडून जबरदस्त प्रत्यूत्तर मिळत असून पाकिस्तानला जबर नुकसान उचलावे लागल्याच्या बातम्या आहेत.

भारत-चीनमध्ये सीमावाद चिघळलेला असताना भारताचे लष्कर चीनलगतच्या सीमाभागाकडे केंद्रित झाले आहे. याचा फायदा उचलून पाकिस्तानने भारताच्या ताब्यातून काश्मीर हिसकावून घेण्यासाठी लष्करी हालचाली कराव्यात असा सल्ला पाकिस्तानातील काही महाभाग देत आहेत. किंबहुना भारतीय लष्कराच्या पीओके ताब्यात घेण्याच्या योजना लक्षात घेऊन चीनने भारताच्या सीमेवरील तणाव जाणीवपूर्वक वाढविला आहे, असा दावा पाकिस्तानचे लष्करी विश्लेषक करू लागले आहेत. म्हणूनच या संधीचा फायदा उचलून पाकिस्तानने लष्करी मुसंडी मारावी. कारण भारत एकाचवेळी पाकिस्तान व चीन अशा दोन सीमांवर लढू शकणार नाही, असा तर्क पाकिस्तानचे हे लष्करी विश्लेषक मांडत आहेत. मात्र पाकिस्तान आणि चीनयांचे संगनमत लक्षात घेऊन भारताने फार आधीपासूनच एकाचवेळी दोन आघाड्यावर युद्धाची तयारी ठेवली आहे. त्यामुळे भारताला छेडण्याची घोडचूक करू नये असा इशारा भारतीय सामरिक विश्लेषक देत आहेत.

leave a reply