भारतीय प्रतिभाशाली आणि ध्येयनिष्ठ

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रशंसा

मॉस्को – भारतीय प्रतिभाशाली व ध्येयनिष्ठ आहेत, अशी प्रशंसा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. भारतीयांना विकासाच्या प्रेरणेने जबरस्त गती मिळालेली आहे. जवळपास दीड अब्ज जनसंख्या असलेल्या या देशाला मिळालेली गती, पुढच्या काळात थक्क करणारे परिणाम समोर घेऊन येईल, असा विश्वास रशियन राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूवी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते. 7 ते 8 नोव्हेंबर रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री रशियाला भेट देणार आहेत. त्याच्या आधी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताबाबत केलेली ही विधाने महत्त्वपूर्ण ठरतात.

putin_militaryशुक्रवारी रशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘युनिटी डे’च्या कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष पुतिन बोलत होते. यावेळी त्यांनी भारताचे उदाहरण देऊन भारतीयांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. भारतीय प्रतिभाशाली व ध्येयनिष्ठ असल्याचे सांगून विकासाच्या प्रेरणमुळे भारतीयांना गती मिळालेली आहे, असा दावा करून भारताची जनता पुढच्या काळात साऱ्या जगाला थक्क करणारे परिणाम समोर घेऊन येईल, असा विश्वासही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात गुरूवारी देखील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण तसेच भारताच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले होते.

भारताचे पंतप्रधान राष्ट्रहिताचे निर्णय घेतात व त्यांचे परराष्ट्र धोरण देखील स्वतंत्र आहे. यामुळे भारतीय जनता ठामपणे आपल्या नेतृत्त्वाच्या मागे उभी राहिलेली आहे. यामुळे भारताला जगभरातून सन्मान मिळत आहे. अशा भारताबरोबर रशियाचे विशेष संबंध आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांना नितांत आवश्यकता असताना नेहमीच सहाय्य केले आहे. दोन्ही देशांचे संबंध पुढच्या काळातही असेच राहतील, याचा मला विश्वास आहे, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले होते. याबरोबरच ब्रिटिशांची वसाहत असलेला भारत आज विकासाच्या महामार्गावर वाटचाल करीत आहे, याकडे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेला सच्चा मित्रदेश आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात रशियाला फार मोठे स्थान आहे, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला.

दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 7 ते 8 नोव्हेंबर रोजी रशियाला भेट देणार असून युक्रेनचे युद्ध अधिक विध्वंसक स्वरूप धारण करीत असताना, त्यांची ही रशियाभेट अतिशय महत्त्वाची ठरते. युक्रेनचे युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आपले योगदान द्यायला तयार आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अनेकवार जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्रमंत्र्यांचा हा रशिया दौरा महत्त्वपूर्ण ठरतो.

leave a reply