युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रांचा वापर होता कामा नये

चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला इशारा

बीजिंग – युक्रेनच्या युद्धात रशियाने अण्वस्त्रांचा वापर करता कामा नये, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बजावले आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याबरोबरील भेटीदरम्यान चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला दिलेला हा संदेश पाश्चिमात्यांना खूश करणारा ठरतो. युक्रेनच्या युद्धात रशियाची बाजू उचलून धरणाऱ्या चीनच्या भूमिकेत बदल होऊ लागल्याचे संकेत यातून मिळत आहेत. चीनचा प्रभाव असलेल्या उत्तर कोरियाकडून सातत्याने दक्षिण कोरिया व अमेरिकेवरही अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण शेजारी देश असलेल्या उत्तर कोरियाविरोधात चीन अशा प्रकारचे संदेश द्यायला तयार नाही. त्या पार्श्वभूमीवर, रशियासारख्या जबाबदार देशाकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यावर चीनकडून आलेली ही प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी आहे.

Xi Jinpingजर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ चीनच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली. युरोपिय देशांचे चीनबरोबरील संबंध ताणलेले असताना चॅन्सेलर शोल्झ यांच्या या दौऱ्याकडे युरोपिय देश देखील संशयाने पाहत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यावर नाराजी व्यक्त करून यामुळे जर्मनी युरोपात एकटा पडेल, असे बजावले आहे. मात्र चॅन्सेलर शोल्झ यांच्या या दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाबाबत केलेली विधाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. युक्रेनच्या युद्धात रशियाने अण्वस्त्रांचा वापर करता कामा नये, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि शोल्झ यांनी अण्वस्त्रांच्या वापराविरोधात दोन्ही देशांचे एकमत असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच अणुयुद्ध सुरूच होता कामा नये, ते कुणालाही परवडणारे नाही, असा इशारा दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे दिला. युक्रेनच्या युद्धात रशियाची बाजू घेऊन पाश्चिमात्यांना इशारे देणाऱ्या चीनच्या भूमिकेत झालेला हा बदल लक्षणीय ठरतो. रशियाला अणुयुद्धाच्या विरोधात इशारे देणाऱ्या चीनने, आपल्या शेजारी असलेल्या उत्तर कोरियाला अणुयुद्धाच्या विरोधात कठोर शब्दात खडसावलेले नाही. उलट उत्तर कोरियाच्या आण्विक धमक्यांच्या मागे चीनचा हात असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे रशियाने दिलेल्या अणुयुद्धाच्या इशाऱ्या विरोधात चीनने स्वीकारलेली ही भूमिका दुटप्पी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी जर्मनीच्या चॅन्सेलरच्या चीनभेटीचे औचित्य साधणे, ही देखील विलक्षण बाब ठरते.

रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर, चीनने रशियाच्या बाजूने भूमिका स्वीकारली होती. त्यासाठी पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा धोका देखील चीनने स्वीकारला होता. पण पुढच्या काळात चीनच्या काही कंपन्या व बँकांनी अमेरिका व पाश्चिमात्यांच्या निर्बंधांच्या धास्तीने रशियाबरोबरील व्यवहारातून माघार घेतल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता अणुयुद्धावरून रशियाला चीनकडून मिळत असलेला हा इशारा चीनचे रशियाबरोबरील संबंध सुरळीत नसल्याचे दाखवून देत आहे. त्याचवेळी चीनला भेट देणारे जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ यांनाही युरोपात विरोध होत आहे.

चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी शोल्झ यांनी हॅम्बर्ग पोर्टसाठी चिनी गुंतवणुकीला मान्यता दिल्याने अमेरिकेनेही चिंता व्यक्त करून त्यावर सावधगिरीचा इशारा दिला होता. तर शोल्झ यांचा दौरा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकतंत्री व मानवाधिकारविरोधी धोरणांना बळ दिल्याचे संकेत देणारा ठरेल, असा इशारा जर्मनीच्या सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनी दिला आहे. जर्मनीतील सरकारी वृत्तवाहिनी ‘डॉईश वेल’नेही शोल्झ यांची चीन भेट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे वृत्त प्रसारित केले होते.

तरीही चॅन्सेलर ओलाफ शोल्झ आघाडीच्या उद्योजकांचा समावेश असलेल्या 60 जणांच्या शिष्टमंडळासह चीन दौऱ्यावर दाखल झाले. मुख्य म्हणजे तैवानच्या विरोधात चीनने आक्रमक लष्करी डावपेचांचा वापर सुरू केल्यानंतर, जर्मनीने तैवानला शिष्टमंडळ धाडून चीनला आव्हान दिले होते. मात्र ही चॅन्सेलर शोल्झ यांच्या चीनभेटीची पूर्वतयारी असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे जर्मनीला युरोपातून होणारा विरोध वाढू शकतो. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेला इशारा ही बाब अधोरेखित करीत आहे.

leave a reply