इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताची प्रमुख भूमिका

दक्षिण कोरियाचा दावा

Indo-Pacific regionसेऊल – मुक्त, शांत, समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी दक्षिण कोरियाने आपले धोरण जाहीर केले. यात अफाट क्षमता व समान मुल्य असलेल्या भारताची इंडो-पॅसिफिक क्षेत्रात प्रमुख भूमिका असेल, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. याच्या काही दिवस आधी जपानने देखील भारत ही इंडो पॅसिफिक क्षेत्रातील मोठी शक्ती असल्याचे सांगून या क्षेत्राच्या भल्यासाठी भारताबरोबरील सहकार्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. तर कॅनडानेही आपले इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतचे धोरण जाहीर करताना, भारताबरोबरील आपल्या सहकार्याला विशेष महत्त्व दिले. चीनपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संभवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, या देशांनी भारताबरोबरील सहकार्याला दिलेले हे महत्त्व सामरिक विश्लेषकांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘स्ट्रॅटेजी फॉर अ फ्री, पीसफुल अँड प्रॉस्परस इंडो-पॅसिफिक रिजन’ नावाचा सुमारे 43 पानांचा अहवाला दक्षिण कोरियाने प्रसिद्ध केला. अशारितीने इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी दक्षिण कोरियाने पहिल्यांदाच आपल्या धोरणाची माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. यात सदर क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा देश असलेल्या चीनचा कमीत कमी प्रमाणात उल्लेख करून दक्षिण कोरियाने अतिशय सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र भारत हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अफाट क्षमता व दक्षिण कोरियासारखीच मुल्ये असलेला देश असल्याची ठळक नोंद सदर अहवालात करण्यात आलेली आहे. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताची प्रमुख भूमिका असल्याचे सांगून दक्षिण कोरियाने पुढच्या काळात भारताबरोबरील सहकार्य वाढविण्यात येईल, असे म्हटले आहे.

Indo-Pacificदक्षिण कोरिया तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांना चीनच्या वर्चस्ववादी कारवायांपासून धोका संभवतो. दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाकडून सर्वनाशाच्या धमक्या दिल्या जातात. उत्तर कोरियाच्या या आक्रमकतेमागे चीनचे पाठबळ असल्याचे वारंवार समोर आले होते. अशा परिस्थितीत आपल्यासमोर खड्या ठाकलेल्या धोक्याचे मूळ चीनमध्ये असल्याची जाणीव दक्षिण कोरियाला असून यासाठीच दक्षिण कोरियाने आपल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील धोरणाची घोषणा करताना भारताबरोबरील सहकार्याला विशेष महत्त्व दिल्याचे दिसत आहे. या क्षेत्रातील प्रमुख भूमिका असलेला देश असा भारताचा उल्लेख करून दक्षिण कोरियाने आपल्या धोरणांमध्ये भारताबरोबरील राजनैतिक व लष्करी पातळीवरील सहकार्याला फार मोठे महत्त्व असेल, असा संदेश दिला आहे.

काही दिवसांपूर्वी जपानने देखील इंडो-पॅसिफिक क्षेत्र व आपल्या सुरक्षेबाबतच्या धोरणाची माहिती देताना भारताबरोबरील आपल्या देशाच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. या सागरी क्षेत्रात भारताचे स्थान असाधारण असल्याचे सांगून जपानने चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना विरोध करण्यासाठी भारताशी सहकार्य करण्याचे संकेत दिले होते. त्याच्याही आधी, नोव्हेंबर महिन्यात कॅनडाने आपले इंडो-पॅसिफिक क्षेत्राविषयीचे धोरण जाहीर करून कॅनडा भारताबरोबरील आपल्या सहकार्यात वाढ करणार असल्याची घोषणा केली होती.

विशेषतः इंडोनेशियाच्या बालीमध्ये पार पडलेल्या जी20 परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याचे समोर आल्यानंतर, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताबरोबरील सहकार्यासाठी कॅनडाने घेतलेला पुढाकार लक्षणीय ठरला होता. चीन अधिकाधिक प्रमाणात अस्थैर्य माजविणारा देश बनू लागला आहे, तर भारत कॅनडाचा महत्त्वाचा भागीदार देश बनला आहे, असा दावा पंतप्रधान ट्रुडो यांनी केला होता.

हिंदी English

leave a reply