इस्रायल व पॅलेस्टाईनमधील तणाव वाढला

जेरूसलेम – इस्रायलचे अंतर्गत सुरक्षामंत्री बेन ग्वीर यांनी टेंपल माऊंटला दिलेल्या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. तुर्की व सौदी अरेबियाने याचा कडक शब्दात निषेध नोंदविला. तर हा इस्रायलने चढविलेला हल्लाच ठरतो, असा आरोप हमासने केला आहे. मात्र बेन ग्वीर यांनी इथे इस्रायलचे नियंत्रण आहे, हे सिद्ध झाल्याचे सांगून यावर समाधान व्यक्त केले. तसेच या भागासाठी अधिक आर्थिक तरतूद करण्याचे आवाहन ग्वीर यांनी इस्रायलच्या सरकारला केले.

इस्रायल व पॅलेस्टाईनमधील तणाव वाढलाज्यूधर्मियांसाठी पवित्र असलेले टेंपल माऊंट व इस्लामधर्मियांसाठी पवित्र स्थान असलेल्या अल अक्सा प्रार्थनास्थळावरून इस्रायलचा पॅलेस्टिनी तसेच आखाती देशांबरोबर गंभीर वाद आहे. 1967 साली झालेल्या सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने जॉर्डनकडून इथली भूमी ताब्यात घेतली होती. त्यानंतरच्या काळात इथे इस्रायलचे प्रशासन असले तरी अल अक्साचे व्यवस्थापन जॉर्डनकडून पाहिले जात होते. ज्यूधर्मियांना इथे प्रवेश दिला जात होता, मात्र इथे त्यांना प्रार्थनेची परवानगी मिळालेली नव्हती. या व्यवस्थेच्या विरोधात इस्रायलमध्ये वेळोवेळी असंतोष व्यक्त करण्यात येत होता.

त्याचवेळी इस्रायल अल अक्सावरील आपला अधिकार डावलत असल्याचा आरोप पॅलेस्टिनी संघटनांनी केला होता. गेल्या काही महिन्यांपासून यावरून निर्माण झालेला वाद अधिकच चिघळत चालला आहे. जानेवारी महिन्यात जॉर्डनच्या राजदूतांना इस्रायली यंत्रणांनी या प्रार्थनास्थळात प्रवेश करण्यापासून रोखले होते. त्यावर जॉर्डनने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. इथे इस्रायलच्या विरोधात निदर्शने करणारे हमास व इतर कट्टरपंथिय संघटनांचे हस्तक असल्याचे सांगून इस्रायली यंत्रणांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली होती. यावरही जॉर्डनने इस्रायलला भयंकर परिणामांचा इशारा दिला होता. या परिणामांना सर्वस्वी इस्रायलच जबाबदार असेल, असे जॉर्डनने बजावले होते.

त्या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे जहालमतवादी नेते आणि अंतर्गत सुरक्षामंत्री बेन ग्वीर यांनी टेंपल माऊंटला दिलेली भेट अतिशय वादग्रस्त ठरली आहे. जॉर्डन, सौदी अरेबिया, तुर्की या देशांनी त्याचा निषेध केला आहे. तर पॅलेस्टिनींची जहाल संघटना हमासने हा आमच्यावर इस्रायलने केलेला हल्लाच ठरतो, असे बजावले आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी संघटनांकडून याविरोधात आक्रमक हालचाली होण्याची शक्यता बळावली आहे. त्यातच बेन ग्वीर यांनी केलेले विधाने हा वाद अधिकच भडकवत असल्याचे दिसते.

हमासच्या धमक्यांची पर्वा न करता आपण टेंपल माऊंटला भेट दिली, ही एकच बाब इथे इस्रायलचे नियंत्रण आहे, हे सिद्ध करीत असल्याचे बेन ग्वीर म्हणाले. यासाठी प्रयत्न करणाऱ्या इस्रायली सुरक्षा दलांची ग्वीर यांनी प्रशंसा केली. त्याचवेळी हमासच्या धमक्यांना इस्रायल भीक घालत नसल्याचे यातून स्पष्ट झाल्याचा दावाही बेन ग्वीर यांनी केला आहे. यामुळे इस्रायल व पॅलेस्टाईनच्या संघटनांमध्ये नवा संघर्ष पेट घेण्याची शक्यता बळावली आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्लामिक जिहादने गाझातून इस्रायलवर 1200 हून अधिक रॉकेट्स व मॉर्टर्सचा मारा केला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझातील इस्लामिक जिहादच्या ठिकाणांवर हल्ले चढविले होता. पाच दिवसांच्या या संघर्षात इस्लामिक जिहादचे पाच कमांडर्स व इतर दहशतवादी ठार झाले खरे, पण यात पॅलेस्टिनींचाही बळी गेल्याचे सांगितले जाते. तर इस्रायली संरक्षणदलांनी चढविलेल्या नेमक्या हल्ल्यांमुळे आपल्या शत्रूंना योग्य तो इशारा मिळालेला आहे, अशा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला होता. तर इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी इस्लामिक जिहादबरोबरील संघर्षबंदी झाली तरी इस्रायलच्या कारवाया थांबणार नसल्याचे बजावले होते.

अशा परिस्थितीत बेन ग्वीर यांच्या टेंपल माऊंट भेटीने इस्रायल व पॅलेस्टाईनमधील तणाव नव्याने वाढत चालल्याचे दिसत आहे. केवळ पॅलेस्टिनी संघटनाच नाही, तर जॉर्डन, सौदी, तुर्की या देशांकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया आल्याने याचे गांभीर्य अधिक वाढल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply