पाश्चिमात्य देशांच्या रशियावरील निर्बंधांमुळे आफ्रिकेवर उपासमारीचे संकट ओढावले

- आफ्रिकन महासंघाच्या प्रमुखांची टीका

मॉस्को – आफ्रिकी देशांमधील महागाई आणि दुर्भिक्ष्याचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले असून यासाठी रशिया व युक्रेनमधील युद्ध जबाबदार असल्याचा आरोप अमेरिका व युरोपिय देश करीत आहेत. पण सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष व आफ्रिकन महासंघाचे प्रमुख मॅकी साल यांनी रशियावरील आरोप धुडकावले. याउलट पाश्चिमात्य देशांनीच रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे अन्नसंकटाचा धोका बळावला, अशी टीका राष्ट्राध्यक्ष साल यांनी केली.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यामुळे जगभरात अन्नसंकट उभे राहिल्याचा दावा पाश्चिमात्य देश करीत आहेत. रशिया व युक्रेन अन्नधान्याचे मोठे निर्यातदार म्हणून ओळखले जातात. यांच्यातच युद्ध पेटल्यामुळे अन्नधान्याच्या आयातीवर अवलंबून असलेले देश येत्या काळात दुर्भिक्ष्याला सामोरे जातील, असे इशारे आंतरराष्ट्रीय संघटना व विश्लेषक देत आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे आफ्रिकी देश सर्वाधिक प्रमाणात बाधित झाल्याचा दावा केला जातो.

अशा परिस्थितीत, आफ्रिकन महासंघाचे प्रमुख मॅकी साल आणि आफ्रिकन कमिशनचे अध्यक्ष फाकी महामात यांनी शुक्रवारी रशियाचा दौरा केला. सोची येथील सरकारी रिसॉर्टमध्ये आफ्रिकन महासंघाच्या नेत्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. यानंतर आफ्रिकन महासंघाचे प्रमुख मॅकी साल यांनी माध्यमांशी बोलताना, रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे आफ्रिकी देशांची परिस्थिती अतिशय अवघड होऊन बसल्याचे सांगितले.

putin-auपाश्चिमात्य देशांनी लादलेल्या या निर्बंधांमुळे आफ्रिकी देश रशियाकडून अन्नधान्य आणि शेतीसाठी आवश्यक खताची आयात करण्यात अपयशी ठरत आहेत. याचा थेट परिणाम आफ्रिकेतील अन्नसंकटाशी जोडलेला असल्याची आठवण साल यांनी करुन दिली. सध्या जगासमोर अन्नसंकट आणि रशियाविरोधी निर्बंध हे दोन महत्त्वाचे मुद्दे असल्याचा दावा साल यांनी केला.

दरम्यान, रशियाने युक्रेनवर युद्ध पुकारण्याच्याही आधी ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ या भागातील सव्वा कोटीहून अधिक जनता उपासमारीला सामोरे जात होती. केनिया, सोमालिया आणि इथिओपिया सध्या दुष्काळाला सामेोरे जात असल्यामुळे येथील परिस्थिती अधिकच बिकट बनल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या गटाने बजावले होते, याकडे रशियन माध्यमे लक्ष वेधत आहेत. त्यामुळे आफ्रिकेतील अन्नसंकटासाठी रशिया-युक्रेन युद्ध पूर्णपणे जबाबदार नसल्याचा दावा रशियन माध्यमे करीत आहेत.

leave a reply