‘एलओसी’वरील भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची जबर हानी

उरी – पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील (एलओसी) संघर्षबंदीचे उल्लंघन सुरू ठेवले आहे. शुक्रवारी येथील पुंछ आणि उरी सेक्टरमध्ये मॉर्टर्सचे हल्ले चढवून पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी जोरदार प्रयत्‍न केले. पण भारतीय सैनिकांच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानी लष्कराचे मनसुबे पुन्हा उधळले गेले. गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैनिकांकडून केल्या जाणार्‍या या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराची जबर हानी होत असल्याचा दावा केला जातो. जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.

काश्मीरच्या उत्तरेकडील उरी सेक्टरमधील कमालकोट आणि जवळच्या भागात पाकिस्तानी लष्कराने गुरुवार मध्यरात्रीनंतर मॉर्टर्सचे हल्ले चढविले. नियंत्रण रेषेवरील नानक पोस्ट या भारतीय सैनिकांच्या चौकीजवळ तसेच त्यापलिकडील नागरी वस्त्यांना लक्ष्य करुन पाकिस्तानी लष्कराने हल्ले केले. तर त्यानंतर शुक्रवारी दुपारी साडे पाचच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेजवळ संघर्षबंदीचे उल्लंघने केले. येथील शहापूर, कसबा आणि किरनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने मॉर्टर्सचे तुफानी हल्ले चढविले. पाकिस्तानी लष्कराने दिवसभरात चार ठिकाणी केलेल्या संघर्षबंदीच्या उल्लंघनाला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.

पाकिस्तानी लष्कराच्या या आगळीकीमध्ये आपली कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे लष्कराने स्पष्ट केले. पण भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराची जबर हानी होत असल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकार्‍याने वरिष्ठ अधिकारी तसेच रावळपिंडी येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रातून सदर माहिती समोर आली आहे. भारतीय सैनिकांच्या कारवाईत नियंत्रणरेषेपलिकडील सहामनी, कोटकोटेरा, तत्तापानी, नाओकोट, कियानी आणि लिपा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराचे जवान मोठ्या संख्येने जखमी झाल्याचे सदर अधिकार्‍याने म्हटले आहे.

या जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्‍न सुरू असले तरी वैद्यकीय सहाय्य कमी पडत असल्याची व्यथा सदर अधिकार्‍याने मांडली आहे. त्याचबरोबर जखमी पाकिस्तानी सैनिकांसाठी सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये १५ टक्के राखीव जागा ठेवण्याची मागणी सदर अधिकार्‍याने केली आहे. गेल्या चार दिवसातच ही मागणी करण्यात आल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानी लष्कराने नेहमीप्रमाणे सीमेवरील संघर्षात होत असलेली हानी जाहीर करण्याचे टाळले आहे. पण भारतीय सैनिकांच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने सीमेजवळ १५० एमएम’च्या तोफा तैनात केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत.

leave a reply