अमेरिका व चीनने आपल्या मर्यादारेषांची परस्परांना जाणीव करुन द्यावी

- अमेरिकेचे ज्येष्ठ हेन्‍री किसिंजर

वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीनने परस्परांशी चर्चा करुन कोणत्या मर्यादांचे उल्लंघन झाल्यास खपवून घेतले जाऊ शकत नाही, ते निश्चित करावे. आत्ताच्या काळात यावर वाटाघाटी होणे शक्यच नाही, असे सांगून ही बाब उडवून लावता येईल. पण तसे झाल्यास, पहिल्या महायुद्धासारखी स्थिती निर्माण होईल, असे अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्‍री किसिंजर यांनी बजावले आहे.

९७ वर्षांचे हेन्‍री किसिंजर एका अभ्यासगटाने आयोजित केलेल्या चर्चेत बोलत होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद भूषविलेल्या किसिंजर यांना अमेरिकेच्या आधुनिक परराष्ट्र धोरणांचा शिल्पकार मानले जाते. सोव्हिएत रशियाबरोबरील अमेरिकेच्या शीतयुद्धात चीनला अमेरिकेच्या बाजूने वळविण्याची व त्याबरोबर सोव्हिएत रशियाला धक्का देण्याची रणनीति किसिंजर यांनीच आखली होती. त्यांच्या या मुत्सद्देगिरीचा फार मोठा लाभ अमेरिकेला मिळाला व यामुळेच अमेरिका शीतयुद्ध जिंकू शकली, असे मानले जाते. म्हणूनच सध्या अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हेन्‍री किसिंजर यांनी केलेली विधाने लक्षवेधी ठरतात.

‘इतर कुठल्याही देशामधून आपल्या आर्थिक व लष्करी वर्चस्वाला आव्हान मिळू नये, असे अमेरिकेला वाटत आहे. पण तंत्रज्ञानाची अफाट प्रगती झालेली असताना कुठल्याही एका देशाचा एकतर्फी वर्चस्वाचे दिवस सरले आहेत. म्हणूनच अमेरिकेने बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी अधिक कल्पकता दाखवायला हवी’, असा सल्ला किसिंजर यांनी दिला आहे. यासाठी अमेरिका व चीनच्या नेत्यांनी चर्चा करावी आणि आपल्या मर्यादा रेषा स्पष्ट कराव्यात, असे किसिंजर यांनी सुचविले आहे.

शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाविरोधात चीनला जवळ करण्याचे धोरण अमेरिकेला भलतेच महाग पडले आणि आज अमेरिकेच्याच गुंतवणूक व बाजारपेठेवर पोहोचलेला चीन पूर्णपणे अमेरिकेवरच उलटला आहे, असा ठपका ट्रम्प प्रशासनाकडून ठेवला जात आहे. चीनचा हा धोका लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या धोरणात अमुलाग्र बदल केले आहेत. या धोरणानुसार, रशिया हा अमेरिकेचा पहिल्या क्रमाकांचा प्रतिस्पर्धी देश नसून चीनकडूनच अमेरिकेला सर्वाधिक धोका असल्याचे मानले जाते. अमेरिकेच्या धोरणातल्या या बदलावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ मुत्सद्दि हेन्‍री किसिंजर यांनी अमेरिका व चीनमधील तणावावर दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते.

leave a reply