शत्रूची रडार यंत्रणा भेदणाऱ्या ‘रूद्रम’ची चाचणी

भुवनेश्वर – शत्रूच्या रडार यंत्रणा भेदणारे ‘अँटी रेडिएशन’ क्षेपणास्त्र ‘रूद्रम-१’ची  बुधवारी ‘सुखोई-३०’ या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ने (डीआरडीओ) विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्रामुळे शत्रूची हवाई सुरक्षा भेदून ती नष्ट करण्याचे सामर्थ्य वायुसेनेला मिळेल, असा दावा केला जातो. ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले ‘अँटी रेडिएशन’ क्षेपणास्त्र आहे. या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘डीआरडीओ’चे अभिनंदन केले.

गेल्या काही दिवसात भारताने सहा वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले आहे. शुक्रवारी ओडिशाच्या व्हीलर बेटावर ‘रूद्रम-१’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘सुखोई -३०’ या लढाऊ विमानातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. येत्या काळात ‘मिराज’, ‘जग्वार’ या लढाऊ विमानांमधून ‘रूद्रम’च्या चाचण्या घेण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे.

‘डीआरडीओ’ भारतीय सरक्षादलांसाठी अत्याधुनिक शस्त्रे विकसित करीत आहे. ‘डीआरडीओने विकसित केलेल्या ‘न्यू जनरेशन वेपन’पैकी ‘रूद्रम’ एक आहे. ‘रूद्रम’ ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने प्रवास करते. रूद्रमच्या मदतीने दूरचे लक्ष्य अचूक टिपणे शक्य होणार आहे. वायुसेनेसाठी तयार करण्यात आलेले अत्यंत प्रभावी क्षेपणास्त्र असून ‘रूद्रम’मध्ये शत्रूची रडार यंत्रणा आणि संपर्क स्थाने निकामी करण्याची क्षमता आहे.

तसेच हे क्षेपणास्त्र २५० किमीपर्यंतचे लक्ष्य नष्ट करु शकते. यामुळे शत्रूची हवाई सुरक्षा निकामी करण्याची क्षमता वायुसेनेने प्राप्त केलेली आहे. यामुळे शत्रूच्या सीमेत अगदी आतापर्यंत घुसून हवाई यंत्रणा निकामी करता येईल, असे वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणाले.

दरम्यान, लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव वाढल्यानंतर, भारताकडून विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. भारताने ‘एलएसी’वर ‘निर्भय’ क्षेपणास्त्र तैनात केले आहे. तर भारत चीन सीमेवर ‘शौर्य’क्षेपणास्त्र तैनात करण्याला मंजुरी दिली आहे. भारताच्या या हालचाली शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या ठरतात, असे विश्लेषक सांगत आहेत.

leave a reply