भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत

नवी दिल्ली – गेल्या वित्तीय वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसर्‍या तिमाहीच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत जीडीपीच्या विकासात तब्बल ८.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाची साथ येण्याच्या आधीपेक्षाही ही कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. ‘नॅशनल स्टॅस्टेटिकल ऑफिस-एनएसओ’ने याची माहिती प्रसिद्ध केली. यामुळे कोरोनाची साथ मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जबरदस्त वेगाने प्रगती करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. जगभरातील इतर प्रमुख देशांच्या तुलनेत भारताची ही आर्थिक कामगिरी नजरेत भरणारी ठरते.

भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेतयावर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीच्या विकासाचा दर २०.१ टक्क्यांनी वाढला. गेल्या वित्तीय वर्षात याच काळात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल २४.४ टक्क्यांनी कमी झाली होती. हा देशाला बसलेला फार मोठा धक्का होता. कोरोनाच्या साथीची तीव्रता वाढल्याने या काळात देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याचे परिणाम अर्थकारणावर झाले आणि यामुळे अर्थव्यवस्था रोडावली होती. यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्याचा फार मोठा फटका काही राज्यांना बसला. ही सारी संकटे मागे टकून भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

यावर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात ३५,७३,४५१ कोटी रुपयांची जीडीपी नोंदविण्यात आली होती. कोरोनाची साथ येण्याच्या आधी या काळात जीडीपीचे प्रमाण ३५,६१,५३० कोटी रुपये इतके होते. तर कोरोनाची साथ आल्यानंतर, देश लॉकडाऊनमध्ये असताना जीडीपीची नोंद ३२,९६,७१८ कोटी रुपये इतकी होती. भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेतत्यामुळे यावर्षी जीडीपीची नोंद कोरोनाची साथ येण्याच्या आधीच्याही काळापेक्षा अधिक असल्याचे उघड झाले आहे. ही बाब देशाला दिलासा देणारी ठरते. याबरोबर एनएसओने दिलेल्या माहितीनुसार देशातील आठ प्रमुख उद्योगक्षेत्रांमध्ये ऑक्टोबर महिन्यात ७.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम् यांनी भारत पुढच्या काळात दोन अंकी विकासदराने प्रगती करील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. वाढलेली मागणी आणि बँकिंग क्षेत्राची कामगिरी लक्षात घेता भारत हे लक्ष्य गाठू शकेल, असा विश्‍वास प्रमुख आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्था अशारितीने गती पकडत आहे, हे देशासाठी समाधानाची बाब ठरते. मात्र असे असले तरी भारतीय अर्थव्यस्थेसमोर अजूनही काही गंभीर आव्हाने आहेत, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे या आर्थिक प्रगतीला खीळ बसू शकते, असा इशारा दिला जातो.

leave a reply