व्हायरसमध्ये सतत बदल होत असल्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही

- सरकारची राज्यसभेत माहिती

‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ धोरणावर पुन्हा भर देण्याची राज्यांना सूचना
नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत असली, तरी पुन्हा संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कोरोनाच्या विषाणूमध्ये सतत बदल होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या साथीच्या संक्रमणावर दिसून येऊ शकतो, असे सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले. तसेच भारत सरकार देशातील आणि जगभरातील कोरोनासाथीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सरकारने स्पष्ट केले. दरम्यान ‘ओमिक्रॉन’ या नव्या कोरोना व्हेरिअंटच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाच्या आधारे केंद्राकडून राज्यांना मंगळवारी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यामध्ये ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ या धोरणावर पुन्हा एकदा बळ देण्यास केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे. तसेच औषधे, ऑक्सिजन व इतर पायाभूत सुविधांची पुरेशा उपलब्धतेकडे लक्ष पुरविण्यासही केंद्राने राज्यांना आदेश दिले आहेत.

व्हायरसमध्ये सतत बदल होत असल्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही - सरकारची राज्यसभेत माहितीकेंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य विषयक सज्जतेविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्च स्तरीय बैठक पार पडली. यावेळी नीति आयोगाचे आरोग्य सदस्य (आरोग्य)डॉ. व्ही.के. पॉल उपस्थित होते. ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटच्या पार्श्‍वभूमीवर राज्यांनी सूचनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करू नये. ते परवडणारे नाही. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता असून विमानतळे, बंदरे आणि रस्ते मार्गांनी सीमा ओलांडून देशात अनेक जण येतात. त्यांची तपासणी व ट्रॅकींग आवश्यक बनले आहे. यासाठी राज्य प्रशासन, इमिग्रेशन अधिकारी, बंदर आरोग्य अधिकारी आणि लँड बॉर्डर क्रॉसिंग ऑफिसर (एलबीसीओ) यांच्यामध्ये प्रभावी समन्वयावर भर द्या, अशी सूचना केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली.

चाचण्यांची व्याप्ती वाढवा, असे पुन्हा एकदा केंद्र सरकारने राज्यांना सांगितले. चाचण्याचे गुणोत्तर लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पुरेशा चाचण्या केल्या जाव्यात. तसेच जोखीम असलेल्या यादीतील देशांमधून येणार्‍या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होईपर्यंत त्यांना विमानतळावर थांबविण्याची व्यवस्था करावी, असेही आदेश देण्यात आले आहे. याशिवाय पॉझिटिव्ह येणारे सर्व अहवाल जिनोम सिक्केन्सिंग तपासण्यासाठी लगेच पाठवा, असेही निर्देश देण्यात आले.

नवीन मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही तत्वे लागू करतानाच त्यांची अंमलबजावणी सुरळीत होणे सुनिश्चित करण्यासाठी बीओआय अर्थात इमिग्रेशन विभाग, एपीएचओ, पीएचओ आणि इतर संबंधित अधिका-यांसमवेत बैठका घेण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी आधीच्या कोरोना लाटांमध्ये सरकार व यंत्रणांनी ज्या पद्धतीने व्यवस्थापन केले अशा लाटांचा सामना करण्याचा अनुभव वाढला आहे. मात्र गर्दी टाळून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जाणे आवश्यक असल्याचे डॉ. व्ही.के. पॉल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अतिशय महत्त्वाचे विधान केलेे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सतत घटत आहे. मात्र कोरोना विषाणू आपल्यामध्ये सतत बदल करीत असून तो सातत विकसित होत आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री पवार म्हणाल्या. तसेच राज्य व केंद्र शासीत प्रदेशांना आतपर्यंत १५० सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

leave a reply