कोरोनावरील स्वदेशी बनावटीची ‘कोवॅक्सिन’ वर्षअखेरीपर्यंत उपलब्ध होईल

- केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली – शुक्रवारी सकाळी जाहीर झालेल्या माहितीनुसार मागील २४ तासात ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाचे ६८,८९८ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाव्हायरसवर परिणामकारक ठरेल, अशी स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन लस या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

'कोवॅक्सिन'

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञ आणि औषधनिर्माते कोरोनावरील लस शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. कोरोनावरील लस शोधणार्‍या कंपन्या लस विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा करीत आहेत. हैदराबादमधील ‘भारत बायोटेक’ने ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) मदतीने कोरोनावरील लस ‘कोवॅक्सिन’ विकसित केली आहे गेल्याच महिन्यात या लसीच्या मानवी चाचण्या घेण्यात आल्या होत्या. कोवॅक्सीन या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणींमध्ये लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला होता.

‘कोवॅक्सिन’सह झायडस कॅडिला कंपनीकडून ’झेडव्हायसीओव्ही-डी’ नावाने एक लस तयार करण्यात येत आहे. तर ’सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि ’ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका’ मिळून कोविशिल्ड लसीवर काम करत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस तयार करण्यात येत असून ही लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनावरील लसीच्या चाचण्या घेण्यात येत असतानाच सरकारकडून ही लस खरेदी करण्यासाठी देखील पावले उचलण्यात येत आहेत. सरकार पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा करीत असल्याची माहिती समोर येत आहे. लस खरेदी केल्यास प्रथम ही लस कोरोना योद्धा, भारतीय जवानांना देण्यात येणार आहे. लसीचा पुरवठा आणि वितरणावर सरकारकडून लक्ष ठेवण्यात येणार असून वितरण करण्याची योजना आखण्यात येत आहे.

दरम्यान, गुरुवारपासून शुक्रवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत देशात ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील मृतांची संख्या ५४,८४९ वर पोहोचली आहे. तर देशातील रुग्णांची संख्या वाढून २९,०५,८२४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात १४ हजार १६१ नवीन रुग्ण सापडले असून ३३९ नव्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. राज्यातील मृतांचा आकडा २१ हजार ६९८ पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५०वर पोहोचली आहे. राज्यात मागील २४ तासात ३०३ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.

leave a reply