दहशतवादी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडा

- भारताचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

नवी दिल्ली – ‘पाकिस्तानने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा. आमची शांतता म्हणजे दुबळेपणाचे लक्षण समजू नये’, असा खरमरीत इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. त्याचबरोबर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडले पाहिजे. तरच पाकिस्तानला आपण करीत असलेल्या चुकांची जाणीव होईल, अशी स्पष्ट भूमिका भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडली. ‘वर्ल्ड कॉन्फरन्स स्पिकर्स ऑफ पार्लेमेंट’च्या पाचव्या परिषदेला संबोधित करताना भारतीय संसदेचे सभापती ओम बिर्ला यांनी पाकिस्तानला फटकारले. या परिषदेत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांचा पाढा वाचला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहाय्याने ‘इंटर पार्लेमेंट ऑफ जिनिव्हा’ आणि ‘पार्लेमेंट ऑफ ऑस्ट्रिया’ने संयुक्तरीत्या ही व्हर्च्युअल कॉन्फरन्स आयोजित केली होती. दहशतवाद आणि कट्टरपंथियाच्या विरोधात प्रामुख्याने यावर चर्चा पार पडली. यावेळी पाकिस्तानच्या सभापतींना भारतीय सभापतींनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा. आमच्या शांततेला दुबळेपणा समजू नये. वेळ पडल्यास भारत कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असे सभापती बिर्ला यांनी यावेळी ठणकावले. तसेच जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भूभाग आहे, असे बिर्ला यांनी बजावून सांगितले.

तर भारताच्या सभापतींनी या बैठकीत पाकिस्तानच्या दहशतवादधार्जिण्या धोरणांचा पर्दाफाश केला. ”दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानच्या संसदेत ‘शहीद’ची उपमा देण्यात आली. पाकिस्तानमध्ये सहा हजार दहशतवादी सक्रीय आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ४० हजार दहशतवादी देशात असल्याचे मान्य केले. संयुक्त राष्ट्रसंघानेही पाकिस्तान दहशतवाद्यांना निर्यात करतो, हे स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडले पाहिजे”, असे बिर्ला यांनी बजावले. त्याशिवाय हा देश वठणीवर येणार नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले.

leave a reply