तेलंगणाच्या हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पातील आगीत नऊ जणांचा बळी

हैद्राबाद – तेलंगणाच्या ‘श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक लेफ्ट बँक हायडल पॉवर स्टेशन’ला लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा बळी गेला. तर तीन जण जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आग नियंत्रणात आल्याचे अग्नीशमन दलाने म्हटले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.

हायड्रोइलेक्ट्रिक

गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास या प्रकल्पाच्या ‘युनिट वन’मध्ये आग लागली. इलेक्ट्रिक पॅनल्समध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग भडकल्याचे सांगितले जाते. त्यावेळी १७ जण या प्लांटमध्ये होते. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्‍न केला होता पण त्यांचे प्रयत्‍न अपुरे पडले. यातील आठ जणांना सुखरुप बाहेर पडण्यात यश आले. पण नऊ जण टनेलमध्ये अडकले.

आगीच्या धुरामुळे त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांनी घटनास्थळीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स शेअर केले होते. त्यांच्या सुटकेसाठी ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक’ (एनडीआरएफ) आणि ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल’ने (सीआयएसएफ) शर्थीचे प्रयत्न केले. तेलगंणाचे ऊर्जा मंत्रालयही त्यांच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून होते. धुराच्या लोटमुळे एनडीआरएफ आणि सीआयएसएफला टनेलपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे गुदमरुन नऊ जणांचा बळी गेला. यात पाच इंजिनिअर्सचा समावेश होता.

हायड्रोइलेक्ट्रिक

दरम्यान, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या डेप्युटी इंजिनिअरच्या कुटुंबाना ५० लाख रुपये जाहीर केले. तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर जणांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये जाहीर केले. तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आणि घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांट बंद ठेवण्यात आला आहे.

leave a reply