भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी नवे उपक्रम राबविणार

- संरक्षणदलांच्या संयुक्त बैठकीतील ग्वाही

पॅरिस – रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असतानाच, भारत व फ्रान्सने परस्परांमधील संरक्षण सहकार्य अधिक भक्कम करण्याची घोषणा केली आहे. पॅरिसमध्ये दोन्ही देशांच्या संरक्षणदलांच्या अधिकार्‍यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत, संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी नवे उपक्रम हाती घेण्यावर एकमत झाले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या पार्श्‍वभूमीवर संरक्षणदलांची संयुक्त बैठक महत्त्वाची मानली जाते.

संरक्षण सहकार्यभारत आणि फ्रान्समधील वाढत्या सहकार्याला चीनच्या वर्चस्ववादी कारवायांची पार्श्‍वभूमी आहे. फ्रान्स युरोपिय देश असला तरी फ्रान्सची बेटे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आहेत. यावर फ्रेेंच नागरिकांची वस्ती असून त्यांच्या सुरक्षेला तसेच या क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्याही सुरक्षेला फ्रान्स प्राधान्य देत आहे. म्हणूनच या क्षेत्रातील महत्त्वाचा देश असलेल्या भारताशी सहकार्य करण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय सहकार्यावर सखोल चर्चा झाली होती.

भारताने फ्रान्सबरोबर रफायएल लढाऊ विमानांसाठी करार केला असून नौदल तसेच लष्करासाठीही फ्रान्सकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी संयुक्त नौदल सराव व इतर उपक्रमांच्या माध्यमातून दोन्ही देश परस्परांमधील संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पॅरिसमधील बैठकीत दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांनी नव्या संरक्षण उपक्रमांबाबत चर्चा केली. ‘बैठक मैत्रीपूर्ण वातावरणात झाली. दोन्ही देशांनी संरक्षण अधिक भक्कम करण्यावर संवाद पार पडला’, अशी माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेने दबाव टाकून ऑस्ट्रेलियाने फ्रान्सला दिलेले पाणबुड्यांचे कंत्राट आपल्याकडे खेचून घेतले होते. यामुळे फ्रान्सचे अमेरिकेबरोबरील संबंध ताणलेले आहेत. त्याचवेळी फ्रान्स रशियाच्या विरोधात जाण्यास तयार नसल्याने अमेरिका फ्रान्सवर नाखूश आहे. याच कारणामुळे अमेरिका भारतालाही इशारे देत आहे. त्यामुळे भारत व फ्रान्सच्या सहकार्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

leave a reply