अब्राहम कराराचे परिणाम दिसू लागले; इस्रायलची शस्त्रनिर्यात लक्षणीयरित्या वाढली

अब्राहम करार जेरूसलेम – हवाई सुरक्षा यंत्रणा आणि क्षेपणास्त्रांच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या वर्षी इस्रायलच्या शस्त्रास्त्र निर्यातीत तब्बल ३६ टक्क्यांची वाढ झाली. युएई आणि बाहरिन या आखाती देशांनी इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी सुरू केली आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती उघड केली. युएई व बाहरिन हे इस्रायलबरोबरील अब्राहम करारात सहभागी झालेले देश आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांनी इस्रायलकडून सुरू केलेली शस्त्रास्त्रांची खरेदी लक्षणीय बाब ठरते.

इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या ‘इंटरनॅशनल डिफेन्स कोऑपरेशन डायरेक्टोरेट’ अर्थात सिबात या नावाने ओळखल्या जाणार्‍या विभागाने इस्रायली शस्त्रनिर्यातीचे तपशील जाहीर केले. आत्तापर्यंत इस्रायलच्या शस्त्रनिर्यातीने कधीही दुसेरी आकड्यात प्रवेश केला नव्हता. २०१७ साली इस्रायलची शस्त्रनिर्यात ९.२ टक्क्यांवर पोहोचली होती. तर २०२० साली ही निर्यात ८.३ अब्ज डॉलर्स इतकी होती. युरोपिय देश इस्रायलचे सर्वात मोठे शस्त्रआयातदार देश होते.

पण इस्रायली संरक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रनिर्यात ११.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे सिबातने जाहीर केले. अमेरिका, चीन, रशिया या मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत इस्रायलची ही शस्त्रनिर्यात आकडेवारीच्या दृष्टीने अतिशय छोटी ठरू शकते. पण इस्रायली अर्थव्यवस्थेचा आकार आणि २०२१ सालच्या खरेदीदार देशांची नावे लक्षात घेता इस्रायलच्या शस्त्रनिर्यातीत झालेली ही वाढ दुर्लक्षित करता येणार नसल्याचे आखाती माध्यमांचे म्हणणे आहे.

दरवर्षीप्रमाणे या शस्त्रनिर्यातीत युरोपिय देशांचा ४१ टक्के तर एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचा ३४ टक्के हिस्सा आहे. तर पहिल्यांदाच इस्रायलच्या या शस्त्रनिर्यातीत अरब देशांची देखील नोंद झाली. युएई आणि बाहरिन या दोनच देशांनी इस्रायलकडून केलेल्या शस्त्रखरेदी एकूण निर्यातीच्या सात टक्के इतकी असल्याचे सिबातने स्पष्ट केले. २०२० साली युएई व बाहरिन या अरब देशांनी इस्रायलबरोबर केलेल्या अब्राहम करारामुळे हे शक्य झाल्याचे इस्रायली माध्यमे सांगत आहेत.

इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून आपल्या सुरक्षेला धोका असल्याची जाणीव झालेले युएई व बाहरिन इस्रायलबरोबर सहकार्य करीत आहेत. इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा रॉकेट व क्षेपणास्त्र हल्ल्यांविरोधात यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे या हवाई सुरक्षा यंत्रणांची मागणी वाढत आहे. येत्या काळात इस्रायलची शस्त्रनिर्यात आणखी वेगाने वाढेल व यात अरब देशांच्या मागणीचा मोठा समावेश असेल, असा दावा इस्रायली व आखाती माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, अरब देशच नाही तर युरोपिय देश देखील इस्रायलच्या आयर्न डोम, डेव्हिड्स स्लिंग व ऍरो या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या खरेदीसाठी उत्सूक असल्याचे युक्रेन युद्धामुळे स्पष्ट झाले आहे. इस्रायली माध्यमे याकडे लक्ष वेधत आहेत.

leave a reply