जोधपुरमध्ये भारत-फ्रान्सच्या वायुसेनेत पाच दिवसांच्या युद्धसरावाचे आयोजन

- रफायल विमाने सहभागी होणार

भारत-फ्रान्सजोधपूर – भारत-फ्रान्सच्या वायुसेनेमध्ये जोधपूरमध्ये पाच दिवसाच्या व्यापक युद्धसरावाचे पार पडणार आहे. या सरावात भारताच्या ताफ्यात नुकतीच दाखल झालेली फ्रेंच बनावटीची रफायल विमानेही सहभागी होणार असल्याने याचे महत्त्व वाढले आहे. पहिल्यांदाच द्विपक्षीय युद्धसरावांमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील रफायल सहभागी होत आहेत. चीनबरोबरील तणाव कायम आहे आणि देशाचे संरक्षणदल कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहेत. यापार्श्‍वभूमीवर फ्रान्सबरोबर होणारा हा सराव अतिशय महत्त्वाचा ठरतो.

भारत आणि फ्रान्समधील संरक्षण सहकार्य गेल्या काही वर्षात अतिशय मजबूत झाले आहे. भारत आणि फ्रान्समध्ये दरवर्षी ‘गरुडा’ युद्धाभ्यास पार पडतो. मात्र बुधवारपासून सुरू होणारा हा युद्ध सराव वार्षिक ‘गरुडा’ युद्धासरावापेक्षा स्वतंत्र असेल, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. तसेच दोन्ही देशांचे सहकार्य अतिशय मजबूत बनल्याचे यातून संकेत मिळत असल्याचे या अधिकार्‍याने अधोरेखित केले.

‘एक्स डेझर्ट नाइट२१’ असे या युद्धसरावाचे नाव असून भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सहभागी असलेली आठ रफायल विमानांबरोबर ‘सुखोई-३० एमकेआय’ लढाऊ विमानेही या युद्धसरावात सामील होतील. तसेच फ्रान्सच्या वायुसेनेच्या रफायल विमानांचा ताफाही युद्धसरावात भाग घेईल. याशिवाय दोन्ही देशांची वाहतूक विमाने आणि टँकर एअरक्राफ्टही या युद्ध सरावात भाग घेणार आहेत. ‘स्कायरॉस डेव्हलपमंेंट’अंतर्गत आशियामध्ये फ्रान्सच्या वायुसेनेची विमाने आशियामध्ये तैनात आहेत. फ्रान्सची ही विमाने या युद्धसरावात भाग घेतील. आशियात तैनाती दरम्यान भारतावरून मार्गस्थ होत असताना खास या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आल्याचे अधिकार्‍याने म्हटले आहे.

भारताने फ्रान्सकडून ३६ रफायल विमानांची खरेदी केली आहे. यातील नऊ विमाने आतापर्यंत भारताच्या हवाली आली आहेत. तसेच भारताला आणखी लढाऊ विमानांची आवश्यकता असून भारताला ही विमाने पुरविण्यास फ्रान्स उत्सुक आहे.

अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियांची आघाडी असलेल्या क्वाडमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सने याआधी उत्सुकता दाखविली होती. तसेच या आघाडीत फ्रान्सला सहभागी करुन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. चीनचा प्रभाव व दादागिरी रोखण्यासाठी तयार झालेल्या क्वाडला ‘क्वाड प्लस’चे स्वरुप देण्यात येणार असल्याचे वृत्त होते. यापार्श्‍वभूमीवरही फ्रान्स आणि भारतादरम्यान वाढत असलेले संरक्षण सहकार्य अतिशय महत्वाचे ठरते.

leave a reply