मंदावणार्‍या आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसह महागाई व ऊर्जा संकटामुळे शेअरबाजारांमध्ये घसरण

वॉशिंग्टन/लंडन/टोकिओ – आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीबाबत करण्यात येणारे दावे, ऊर्जा संकट व वाढती महागाई यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थतेचे पडसाद जागतिक शेअरबाजारांमध्ये उमटले असून सोमवार तसेच मंगळवार असे सलग दोन दिवस घसरण दिसून आली. या घसरणीचा परिणाम कच्चे तेल तसेच सोन्यावरही झाला असून तेलाचे दर खाली आले असून सोन्याच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या साथीची तीव्रता काही अंशी कमी होत असल्याने जगातील अनेक देशांनी दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींमुळे विविध उत्पादनांनी मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्याचवेळी कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणात भडकले असून पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम अन्नधान्य व उत्पादनांच्या किंमतींवर झाला असून महागाई चांगलीच भडकली आहे. त्याचवेळी चीन, युरोपसह अनेक देशांमध्ये ऊर्जाटंचाईचे संकट भीषण रुप धारण करीत असल्याचे समोर येत आहे.

या सर्वांचा फटका आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बसण्यास सुरुवात झाली असून अनेक आघाडीच्या वित्तसंस्था व तज्ज्ञांनी यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका व चीनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमधून समोर येणारी आकडेवारीही त्याला बळ देणारी ठरली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. या अनिश्‍चिततेचे पडसाद जागतिक शेअरबाजारांमध्ये दिसून येत आहेत.

सोमवारी तसेच मंगळवारी अमेरिका, युरोप तसेच आशियातील प्रमुख शेअरबाजारांमध्ये घसरण झाली आहे. त्यात अमेरिकेतील डो जोन्स व नॅस्डॅकसह ब्रिटनचा ‘एफटीएसई’, जर्मनी व फ्रान्समधील शेअरबाजार, ‘स्टॉक्स ६००’ तसेच हॉंगकॉंग, शांघाय, सिंगापूर, सिडनी, टोकिओ, सेऊल व मनिलामधील निर्देशांकांचा समावेश आहे. हे शेअर बाजार ०.२ ते एक टक्क्यापर्यंत घसरल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी सकाळी चीनचा तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्देशांक तसेच जपानमधील शेअरबाजारात घसरणीसह व्यवहारांची सुरुवात झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

चीनमधील वीजटंचाई, तंत्रज्ञान व रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू असलेली मोठी कारवाई व इंधनाचे वाढते दर यामुळे गुंतवणुकदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा सिटी प्रायव्हेट बँकेचे प्रमुख अधिकारी डेव्हिड बायलिन यांनी केला. इंधनाचे दर, ऊर्जा टंचाई व पुरवठा साखळीतील अडचणींचा फटका कंपन्यांच्या नफ्यावर होण्याची शक्यता असून त्यामुळे पुढील काही काळ गुंतवणूकदारांमध्ये अनिश्‍चितता कायम राहिल, असेही विश्‍लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

leave a reply