ब्रिटनमधील महागाईचा विक्रमी भडका

लंडन – इंधन व अन्नधान्याच्या दरांमधील वाढ कायम राहिल्याने ब्रिटनमध्ये महागाईचा विक्रमी भडका उडाला आहे. जून महिन्यात ब्रिटनमधील महागाई निर्देशांक 9.4 टक्के असा नोंदविण्यात आला. सलग दोन महिने महागाई निर्देशांक नऊ टक्क्यांवर राहिल्याने ब्रिटीश जनतेसमोरील ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ अधिकच तीव्र झाला आहे. महागाई दरातील वाढ ही मार्च 1982 नंतरची सर्वाधिक वाढ ठरली असून जी7 गटातील देशांमध्ये सर्वोच्च महागाई निर्देशांक नोंदविणारा देश म्हणून ब्रिटनची नोंद झाली आहे.

महागाईचा विक्रमी भडकाइंधनाच्या दरांमध्ये अवघ्या महिन्याभरात 10 टक्क्यांची भर पडली असून अन्नधान्याच्या किंमतीत 1.2 टक्क्यांची वाढ झाली. यात दूध व दुग्धजन्य उत्पादने, भाज्या, मांस, अंडी, रेडीमेड खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात वीजेच्या बिलातही 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून पुढील काळात ही वाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनची मध्यवर्ती बँक व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्याच्या तयारीत आहे, असा दावा सूत्रांनी केला.

रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करून युक्रेनवर हल्ला चढविणारे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना धडा शिकविण्याचा इशारा अमेरिका व ब्रिटनच्या नेतृत्त्वाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात पाश्चिमात्य देशांकडून लादलेले निर्बंध ‘बूमरँग’ होऊन त्यांच्यावरच उलटत असल्याचे दिसू लागले आहे. रशियावर निर्बंध लादणाऱ्या बहुतांश आघाडीच्या देशांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. ही महागाई पुढील काही महिन्यांपर्यंत कायम राहण्याचे संकेतही देण्यात आले असून त्यातून मंदी येऊ शकते, असेही दावे करण्यात येत आहेत.

ब्रिटीश सरकार महागाई रोखण्यासाठी योग्य पावले उचलत नसल्याची नाराजीची भावना तीव्र होत असल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत आहे. महागाई रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढीची उपाययोजना केली असली तरी त्याने महागाईत बदल झालेला नाही. त्यामुळे ब्रिटनच्या विरोधी पक्षांनी सरकारसह संबंधित यंत्रणांवर टीकेची झोड उठविली आहे. ब्रिटीश कुटुंबे संकटाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे टीकास्त्र विरोधी नेते तसेच विश्लेषकांनी सोडले आहे. ब्रिटनमधील महागाईचा दर 11 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असे भाकित तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

leave a reply