अमेरिकेत लवकरच दुसऱ्या गृहयुद्धाचा भडका उडेल

- ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'चा अहवाल

गृहयुद्धाचा भडकावॉशिंग्टन – येत्या काही वर्षात अमेरिकेत दुसऱ्या गृहयुद्धाचा भडका उडेल, असा इशारा ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या अहवालात करण्यात आला. अमेरिकेतील या आघाडीच्या विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात 50 टक्क्यांहून अधिक मतदारांनी दुसऱ्या गृहयुद्धाचे संकेत दिले. तर 22 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी राजकीय कार्यक्रमादरम्यान शस्त्र बाळगण्याचे व त्याचा वापर करण्याचे समर्थन केले. सदर अहवाल ‘वेकअप कॉल’ असून निष्कर्ष अपेक्षेपेक्षा अधिक वाईट असल्याचे संशोधक व तज्ज्ञांनी बजावले आहे.

गृहयुद्धाचा भडका

अमेरिकेची प्रसारमाध्यमे, अभ्यासगट, विश्लेषक तसेच माजी लष्करी अधिकारीही देशात तीव्र होत असलेले राजकीय धु्रवीकरण व त्यातून होणारा संघर्ष आणि हिंसाचाराच्या मुद्याकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत. ‘ब्लॅक लाईव्हज्‌‍ मॅटर’ या गटाने घडविलेली हिंसा, 2020 सालच्या अखेरीस झालेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, त्याचा निकाल आणि 6 जानेवारी, 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घडविलेला हिंसाचार हे मुद्दे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेतील सध्याचे बायडेन प्रशासन ध्रुवीकरण तसेच मतभेद कमी करण्यात अपयशी ठरले आहे. उलट राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची धोरणे व निर्णयांमुळे अमेरिकी जनतेतील असंतोष अधिक तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वीच शिकागो विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स’च्या अहवालात जवळपास 25 टक्के अमेरिकन्स सरकारविरोधात शस्त्रे उचलण्यास तयार असल्याचा इशारा देण्यात आला होता. यात, जवळपास 50 टक्के अमेरिकी नागरिकांना बायडेन यांचे सरकार भ्रष्टाचारी व फसवणूक करणारे असल्याचे वाटते, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. त्यापूर्वी अमेरिकेतील आघाडीचे गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी देश गृहयुद्धाच्या वाटेवर असल्याची जाणीव करून दिली होती. त्यामागे, सध्याची आर्थिक परिस्थिती व जनतेच्या इच्छाआकांक्षा आणि मूल्यांमध्ये निर्माण झालेले तीव्र मतभेद कारणीभूत असल्याचे त्यांनी बजावले होते.

‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या अहवालात राजकीय मतभेद व ध्रुवीकरणाचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे.

leave a reply