‘तेहरिक’ व ‘आयएस’चा ताजिकिस्तानमध्ये शिरकाव

‘आयएस'काबुल – सोव्हिएत रशियातून बाहेर पडलेला मध्य आशियाई देश ताजिकिस्तानमध्ये ‘तेहरिक-ए-तालिबान’ आणि ‘आयएस’ या दोन दहशतवादी संघटनांनी शिरकाव केला आहे. गेल्या चार दिवसांच्या घडामोडीतून ही गंभीर बाब उघड झाली आहे. अमेरिकेने बेजबाबदाररित्या अफगाणिस्तानातून घेतलेली सैन्यमाघार मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरेल. आपल्या शेजारी देशांमध्ये दहशतवादी संघटना घुसखोरी करतील, अशी चिंता रशियाने काही महिन्यांपूर्वी वर्तविली होती. ताजिकिस्तानातील या घटनांमुळे रशियाची चिंता प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसते.

गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केल्यानंतर वेगवेगळ्या प्रांतांसाठी आपले कमांडर गव्हर्नर म्हणून नियुक्त केले होते. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बडाखशान प्रांताचा गव्हर्नर म्हणून ताजिक वंशाचा कमांडर ‘महदी अरसलान’ याला नेमले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये अरसलान याने ताजिक वंशाच्या 250 दहशतवाद्यांना एकत्र करून ‘तेहरिक-ए-तालिबान ताजिकिस्तान’ची (टीटीटी) घोषणा केली.

‘आयएस'गेल्या वर्षी अरसलानच्या गटातील दहशतवाद्यांनी ताजिकिस्तानात घुसून लष्करावर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अरसलानबाबतच्या माहिती ताजिकिस्तानच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. ताजिकिस्तानातील ‘जमात अन्सरुल्ला’ या दहशतवादी संघटनेबरोबर महदी अरसलानचे संबंध आहेत. ताजिक सरकारने अन्सरुल्लावर केलेल्या कारवाईनंतर ‘जमात अन्सरुल्ला’च्या दहशतवाद्यांनी अरसलानबरोबर हातमिळवणी केली. त्यामुळे अरसलानच्या ‘टीटीटी’मध्ये देखील अन्सरुल्लाच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो.

ताजिकिस्तानच्या सुरक्षेला अरसलानच्या दहशतवाद्यांबरोबरच ‘आयएस’पासून देखील धोका असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सीमेवर तैनात लष्करावर रॉकेट हल्ले होत आहेत. ‘आयएस-खोरासन’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर आयएसने ताजिक भाषेत कट्टरपंथियांना सरकारविरोधात चिथावणी देण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी आयएसने ‘अल-आझिम ताजिकी’ सोशल मीडिया चॅनल सुरू केले आहे. आयएसला ताजिकिस्तानातील कट्टरपंथियांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दावे केले जातात.

‘आयएस'तेहरिक आणि आयएस या दहशतवादी संघटनांचा ताजिकिस्तानातील शिरकाव मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची चिंता व्यक्त केली जाते. याआधी अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाने देखील अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीमुळे शेजारी देशांची सुरक्षा धोक्यात येत असल्याचा इशारा दिला होता. तसेच तालिबानच्या राजवटीमुळे अफगाणिस्तानातील इतर दहशतवादी संघटनांचा विस्तार होईल व त्यापासून शेजारी देशांना फार मोठा धोका संभवतो, याचीही जाणीव या अहवालांमध्ये करून देण्यात आली होती.

तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येत असताना, रशिया अफगाणिस्तानातील घडामोडींकडे अतिशय सावधपणे पाहत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले होते. मध्य आशियाई देशांमार्फत अफगाणिस्तानातील कट्टरवाद व अस्थिरता रशियाच्या सीमेत दाखल होईल, अशी भीती रशियाला वाटत आहे. यासाठीच अमेरिकेने अफगाणिस्तानातून घाईने लष्करी माघार घेऊन या देशात अराजक माजू दिले, असा संशय रशियन माध्यमांनी व्यक्त केला होता.

leave a reply