अफगाणिस्तानवर राज्य करण्यासाठी पाकिस्तान तालिबानला हत्यारासारखे वापरत आहे

-पाकिस्तानच्या नेत्याचा आरोप

इस्लामाबाद/काबुल – ‘पाकिस्तानला सामरिक आघाडीसाठी अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवायचे आहे. म्हणून पाकिस्तान तालिबानचा हत्यार म्हणून वापर करीत आहे. फक्त तालिबानच नाही तर पाकिस्तान आपले क्षेत्रीय ध्येय गाठण्यासाठी अल-कायदाचा देखील वापर करीत आहे’, असा आरोप पाकिस्तानचे माजी संसद सदस्य अफ्रासियाब खट्टक यांनी केला. पाकिस्तानवर ‘एफएटीएफ’च्या कारवाईची टांगती तलवार असताना, पाकिस्तानच्याच नेत्याने केलेल्या या आरोपांमुळे पाकिस्तानच्या मुखवट्यामागील दहशतवाद जगासमोर येऊ लागला आहे.

हत्यार

पाकिस्तानच्या ‘अवामी नॅशनल पार्टी’चे माजी संसद सदस्य आणि पश्तू जनतेच्या मानवाधिकारांसाठी लढणारे नेते म्हणून खट्टक यांची ओळख आहे. दोन दिवसांपूर्वी खट्टक यांनी अफगाणिस्तानातील माध्यमांशी बोलताना तालिबान आणि पाकिस्तानमधील संबंधांची माहिती उघड केली. अमेरिकेबरोबर संघर्षबंदी करून अफगाणिस्तान सरकारबरोबर वाटाघाटीच्या तयारीत असलेल्या तालिबानने अल कायदाशी सहकार्य नसल्याचे जाहीर केले आहे. पण तालिबान आणि अल-कायदामधील संबंध पूर्ववत असून दोन्ही संघटनांना पाकिस्तानकडून पूर्ण समर्थन मिळत असल्याचा आरोप खट्टक यांनी केला.

तर अफगाणिस्तानातील संघर्ष आणि अस्थैर्यासाठी अफगाण तालिबान जबाबदार नसल्याचे खट्टक म्हणाले. ‘अफगाण संघर्षाचे मूळ या देशाबाहेर आहे’, असे सांगून खट्टक यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानकडे संकेत दिले. अफगाणिस्तानचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनीही आपल्या देशातील अस्थैर्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. पाकिस्तानातील अल कायदा, तालिबानचे नेतृत्व तसेच पाकिस्तानी लष्कर व गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ अफगाणिस्तानात संघर्ष घडवित असल्याचा आरोप केला होता.

अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी देखील तालिबान अजूनही अल कायदाशी सहकार्य ठेवून असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी नेते खट्टक यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिला आहे.

तालिबानचा उपप्रमुख मुल्ला बरादर अब्दुल गनी बरादर पाकिस्तानच्या दौर्‍यावर असताना खट्टक यांनी पाकिस्तानवर ही तोफ डागली आहे. दोन दिवसांपूर्वी तालिबानचा उपप्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर याने देखील एका व्हिडिओमध्ये तालिबानचे नेतृत्व पाकिस्तानात असून त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय काहीही होत नसल्याचे एका व्हिडिओ कबुल केले होते. तर अन्य दोन व्हिडिओमध्ये तालिबानचा नेता मुल्ला फझल अखुंद पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळाला भेट देताना आणि बरादर पाकिस्तानामध्ये अफगाण तालिबानच्या नेत्याची भेट घेताना दाखविण्यात आले होते.

दरम्यान, अफगाणी लष्कराने गेल्या चोवीस तासात हेल्मंड प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात अल कायदाचे ११ तर तालिबानचे दोन दहशतवादी ठार केले आहेत.

leave a reply