जपान 3000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार

चीनच्या राष्ट्राध्यक्षांची उत्तर कोरियाच्या हुकूमशहांशी चर्चा

टोकिओ/बीजिंग – येत्या काळात जपानवर हल्ला झालाच तर थेट शत्रूदेशावर प्रतिहल्ला चढविण्याची तयारी जपान करीत आहे. यासाठी 3000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती जपान करणार आहे. या देशातील आघाडीच्या वर्तमानपत्राने ही माहिती दिली. याद्वारे गेल्या सात दशकांपासून स्वीकारलेले बचावात्मक संरक्षण धोरण सोडून जपान आक्रमक धोरण स्वीकारीत असल्याचे दिसू लागले आहे.

fumio-kishidaदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व इतर जेत्या राष्ट्रांनी केलेल्या करारानंतर जपानने आपले संरक्षणधोरण बचावात्मक ठेवले होते. याअंतर्गत जपानच्या संरक्षणदलातील क्षेपणास्त्रांची मारक क्षमता मर्यादित ठेवण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, जपानच्या नौदलाकडे असलेले ‘टाईप 12’ क्षेपणास्त्र सर्वाधिक 100 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. पण गेल्या काही दिवसांपासून पूर्व आशियाई क्षेत्रात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जपानने संरक्षणसज्जतेवर लक्ष केंद्रीत केले आहे.

यासाठी मध्यम पल्ल्याच्या तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती करणार असल्याचे जपानने जाहीर केले होते. यापैकी हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती 2026 सालापर्यंत पूर्ण करून रूक्यू बेटांवर तैनात केले जाईल. तर माऊंट फुजी, होन्शू बेटावर 2000 किलोमीटरचे लक्ष्य टिपू शकणारी क्षेपणास्त्रे तैनात केली जातील, अशी माहिती ‘माईनीशी’ या वर्तमानपत्राने दिली. 2030 सालापर्यंत 3000 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य हायपरसोनिक वेगाने टिपू शकणारे क्षेपणास्त्र उत्तरेकडील होक्काईदो बेटावर तैनात असेल, असे या बातमीत म्हटले आहे.

त्याचबरोबर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा पुढच्या महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा धोरणात बदल जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यानुसार जपानवर हल्ला झालाच तर शत्रूदेशाचे लष्करी तळ, कमांड सेंटर तसेच अन्य लष्करी ठिकाणांवर प्रतिहल्ले चढविल. अमेरिकेच्या साथीने जपानने शत्रूदेशावर ही कारवाई करू शकतो, अशी माहिती जपानमधील सूत्रांनी स्थानिक वृत्तसंस्थांना दिली. आत्तापर्यंत शत्रूदेशावर किंवा शत्रूची विमाने, विनाशिका यांच्यावर हल्ले चढविण्याचे स्वातंत्र्य जपानच्या लष्कराला नव्हते. त्यामुळे, जपानच्या संरक्षण धोरणातील हा बदल लक्षवेधी ठरतो.

दरम्यान, जपानमधील माध्यमांमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध होत असताना, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांच्याशी संपर्क साधल्याची बातमी येत आहे. पूर्व आशियाई क्षेत्रात शांती प्रस्थापित करण्यासाठी उत्तर कोरियाने चीनला सहाय्य करावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. उत्तर कोरियावरील आपल्या प्रभावाचा वापर करून चीन या देशाच्या चिथावणीखोर कारवाया रोखत नसल्याची तक्रार अमेरिकेने नुकतीच केली होती.

leave a reply