अफगाणिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा असेल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

वाशिंग्टन – अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असली तरी अमेरिकेचा अफगाणिस्तानला कायम पाठिंबा असेल. मात्र आपल्याला काय हवे, हे अफगाणींनी स्वत: ठरवायला हवे. मुर्खपणे सुरू असलेला हिंसाचार थांबवायला हवा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्याबरोबर व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत बायडेन यांनी अफगाणिस्तानला दीर्घकालीन सहकार्याचे आश्वासन दिले. या भेटीआधी अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या तळांवर ड्रोन हल्ले चढवून तालिबानला इशारा दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिलेल्या पाठिंब्याचे अफगाणी राष्ट्राध्यक्ष गनी यांनी स्वागत केले. तसेच अफगाणिस्तानची अमेरिकेबरोबरची भागीदारी फक्त लष्करी नाही तर सर्वसमावेशक असेल, असे राष्ट्राध्यक्ष गनी यावेळी म्हणाले. अफगाणिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर हवे असेल तर, या क्षेत्रातील देशांनी सशस्त्र संघटनांना नाही तर आपल्या सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केले.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानतून माघार घेण्याचे जाहीर केले होते. पण पुढच्या दोन आठवड्यांमध्ये ही माघार पूर्ण होणार असल्याचा दावा बायडेन प्रशासनातील अधिकारी करीत आहेत. त्याचबरोबर या सैन्यमाघारीनंतरही अमेरिकेचे 650 हून अधिक जवान अफगाणिस्तानात तैनात असतील, असेही अमेरिकी अधिकारी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितले. त्यातच अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या बघलान आणि कुंदूझ प्रांतात ड्रोन हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये किती तालिबानी ठार झाले, याची माहिती उघड झालेली नाही. पण माघारीनंतरची अमेरिकेची सैन्यतैनाती आणि ड्रोन हल्ल्यांचे पडसाद पाकिस्तानात उमटू लागले.

अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेणार नसल्याची चिंता पाकिस्तानचे पत्रकार व्यक्त करू लागले आहेत. अमेरिकेने 650 जवानांची घोषणा केली असली तरी ही संख्या याहून मोठी असू शकते. यामध्ये अमेरिकेचे खाजगी कंत्राटदारांचाही समावेश असू शकतो, असे हे पत्रकार चिंतित स्वरात सांगू लागले आहेत. त्याचबरोबर, अमेरिका सहजासहजी बगराम हवाईतळ सोडणार नसल्याचे या पत्रकारांचे म्हणणे आहे.

leave a reply