इराणमधील निदर्शनांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद

  • फुटबॉल वर्ल्डकपमध्ये इराणच्या संघाने राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला
  • कुर्दांवरील इराणच्या लष्करी कारवाईचा इराकमधून तीव्र निषेध

आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाददुबई/दोहा/बगदाद – सलग ६७ दिवस इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना आंतरराष्ट्रीय समर्थन मिळू लागले आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेल्या इराणच्या संघाने देशाचे राष्ट्रगीत सुरू असताना मूक राहून निदर्शनांना पाठिंबा दिला. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून ४२६ जणांचा बळी घेणाऱ्या इराणच्या राजवटीवर कारवाई आवश्यक असल्याची मागणी मानवाधिकार संघटना व इतर संस्थांनी केली. पण या आरोपांकडे दुर्लक्ष करून इराणने निदर्शकांवरील कारवाईची तीव्रता वाढविली आहे. इराणप्रमाणे इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवरही रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत.

गेल्या नऊ आठवड्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना अमेरिका, युरोपिय देशांमध्ये आश्रय घेतलेल्या इराणवंशिय नागरिकांकडून समर्थन मिळत होते. इराणने या परदेशस्थ नागरिकांना बंडखोर ठरवून त्यांच्या आडून पाश्चिमात्य देश इराणविरोधात मोठे कारस्थान आखत असल्याचा आरोप केला होता. पण गेल्या पंधरा दिवसांमध्ये इराणच्या क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या देशात सुरू असलेल्या निदर्शनांना समर्थन देणे सुरू केल्याच्या घटना समोर येत आहेत. कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपसारख्या सर्वात मोठ्या स्पर्धेतील इराणच्या संघाची मूक निदर्शने जगाचे लक्ष खेचून घेणारी ठरली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसादया सामन्यावेळी स्टेडियमध्ये उपस्थित असलेल्या इराणी चाहत्यांनी देखील आपल्या संघाप्रमाणे राष्ट्रगीत सुरू असताना मूक राहून इराणमधील राजवटीच्या विरोधातील आपला असंतोष व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी इराणी बास्केटबॉलपटू, स्विमर्स यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अशीच भूमिका घेतली होती. पण फिफा फुटबॉल वर्ल्डकपसारख्या सर्वात मोठ्या स्पर्धेत इराणच्या खेळाडूंनी केलेली निदर्शने चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याचबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सकडून निदर्शकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईच्या धक्कादायक बातम्याही समोर येऊ लागल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाददोन दिवसांपूर्वी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी इराणमधील कुर्दांची वस्ती असलेल्या ‘जवानरुद’ शहरात निदर्शकांवर मशिनगनने बेछूट गोळीबार केला. यामध्ये पाच ते सात निदर्शक ठार झाल्याचा दावा केला जातो. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी निदर्शकांच्या डोक्यावर आणि छातीवर गोळ्या झाडल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. या गोळीबारात निदर्शक मोठ्या संख्येने जखमी झाले असून त्यांना घरच्याघरीच उपचार दिले जात आहेत. रुग्णालयात भरती केल्यास रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स त्यांना उचलून नेतील आणि जीवे मारतील, अशी भीती स्थानिक व्यक्त करीत आहेत.

गेल्या चोवीस तासात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवरही हल्ले चढविले आहेत. काही वर्षांपूर्वी इराणमधून पलायन केलेल्या कुर्द नेत्यांनी इराकच्या उत्तरेकडील भागात आश्रय घेतला होता. येथेच या इराणी कुर्द नेत्यांनी ‘कोमला पार्टी ऑफ इरानियन कुर्दिस्तान’ या पक्षाची स्थापना करून त्याचे मुख्यालय सुरू केले होते. याच मुख्यालयावर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी हल्ले चढविले. यामध्ये झालेल्या जीवितहानीची माहिती उघड झालेली नाही. पण इराकच्या सरकारने इराणच्या या हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी इराणच्या कुर्द भागातून सुरू झालेली ही निदर्शने आत्ता इराणच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. इराणने निदर्शकांना दंगलखोर ठरवून त्यांना अमेरिका, इस्रायल व सौदी अरेबियाकडून समर्थन मिळत असल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच या निदर्शनांमुळे इराणमधील व्यवस्थेला काहीही धोका नसल्याचा दावाही इराणच्या सरकारने केला आहे. पण सलग नऊ आठवडे सुरू असलेली निदर्शने रोखण्यात इराणचे सरकार अपयशी ठरत असल्याची बाब आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

leave a reply