देशातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्सवर नेणार

- केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णव

नवी दिल्ली – इलेक्ट्रॉनिक्स व माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी आपल्या मंत्रालयाच्या व्हिजन डॉक्युमेंटचा दुसरा खंड प्रसिद्ध केला. यात २०२६ सालापर्यंत देशातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उत्पादन ३०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीचे पावरहाऊस म्हणून भारताला स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून त्याचा आराखडा या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मांडण्यात आला आहे.

देशातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्सवर नेणार - केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णवया आराखड्यात पुढच्या पाच वर्षांसाठीच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे तसेच त्याच्या निर्यातीचेही ध्येय यानुसार समोर ठेवण्यात आले आहे. सध्या देशात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उत्पादन ७५ अब्ज डॉलर्स इतके आहे. यात फार मोठी वाढ करून २०२६ सालापर्यंत ते ३०० अब्ज डॉलर्सवर नेले जाईल. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट्स इत्यादींबरोबर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो इलेक्ट्रॉनिक्स तसेच स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उपकरणांच्या निर्मितीचे जागतिक स्तरावरील पावरहाऊस बनेल, असा विश्‍वास अश्‍विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. सध्या भारतात वर्षाकाठी सुमारे ३० अब्ज डॉलर्स इतक्या प्रमाणात मोबाईल्सचे उत्पादन होत आहे. याचे प्रमाण वाढवून ते १०० अब्ज डॉलर्सवर नेले जाईल, असे वैष्णव पुढे म्हणाले. भारताची या क्षेत्रातील एकूण वार्षिक निर्यात १५ अब्ज इतकी आहे. २०२६ सालापर्यंत ही निर्यात १२० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याची महत्त्वाकांक्षी वैष्णव यांनी व्यक्त केली.

२०२५-२६ सालापर्यंत भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची मागणी १८० अब्ज डॉलर्सवर जाईल, असे या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा अवास्तव दावा नसल्याचे नॅशनल पॉलिसी इलेक्ट्रॉनिक्सने (एनपीई) म्हटले आहे. दरम्यान, देशांतर्गत फार मोठी मागणी असूनही भारत बराच काळ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उपकरणांची आयात करीत होता. पण आता याची देशांतर्गत निर्मिती करण्यासाठी भारताने झपाट्याने पावले उचलल्याचे दिसत आहे.

leave a reply