झरिफ ऑडिओ टेप लीक प्रकरणी इराणचा सौदी-इस्रायलवर आरोप

तेहरान – इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांच्या वादग्रस्त मुलाखतीची ऑडिओ टेप माध्यमांमध्ये लीक करण्याचा कट सौदी अरेबिया आणि इस्रायल यांनी आखला असावा. अणुकरारावर चर्चा सुरू असताना ही ऑडिओ टेप प्रसिद्ध करून इराणची कोंडी करण्याचा कट या देशांनी आखला असावा, असा आरोप इराणचे उपराष्ट्राध्यक्ष इशाक जहांगिरी यांनी केला. या प्रकरणी परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी संबंधितांची माफी मागितली आहे. तर झरिफ यांनी फार मोठी चूक केल्याची टीका इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी केली.

Advertisement

गेल्या आठवड्यात लंडनस्थित पर्शियन भाषिक वृत्तवाहिनीने झरिफ यांच्या मुलाखतीची ऑडिओ टेप लीक केली. वर्षभरापूर्वी घेतलेल्या या मुलाखतीत झरिफ यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्स, कुद्स फोर्सेसचे माजी प्रमुख कासेम सुलेमानी यांच्याबाबत केलेल्या विधानांनी इराणमध्ये राजकीय भूकंप घडविला होता. इराणच्या परराष्ट्र धोरणांवर रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स व मेजर जनरल कासेम सुलेमानी यांची पकड होती, या झरिफ यांच्या विधानावर इराणमधून जोरदार टीका झाली. यासाठी इराणच्या संसदेत झरिफ यांचा राजीनामा घ्या, तसेच त्यांच्यावर महाभियोग चालविण्याची मागणी होत आहे.

या मुलाखतीसाठी परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी सुलेमानी यांच्या परिवाराची जाहीर माफी मागितली. तरीही इराणमध्ये झरिफ यांच्याविरोधातील असंतोष वाढला आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांनी रविवारी परराष्ट्रमंत्री झरिफ यांच्यावर ताशेरे ओढले. ‘जगात कुठल्याही देशाचे परराष्ट्र धोरण परराष्ट्र मंत्रालय निश्‍चित करीत नाही. त्या देशातील उच्चपदस्थ अधिकारी यासंबंधीचा निर्णय घेतात आणि धोरण ठरवतात. परराष्ट्र मंत्रालयाला त्यामध्ये सामील केले जाते. तेव्हा इराणच्या जबाबदार नेत्याने सुलेमानी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सवर बेेजबाबदार विधाने करून मोठी चूक केली आहे’, अशा शब्दात खामेनी यांनी झरिफ यांच्यावर तोफ डागली.

इराणच्या राजकारणात सर्वोच्च अधिकार या देशाच्या सर्वोच्च धर्मगुरूकडे आहेत. त्यामुळे खामेनी यांनी झरिफ यांच्यावर केलेल्या टीकेचे गांभीर्य वाढले आहे. पण इराणमधील रोहानी यांचे सरकार झरिफ यांचा बचाव करीत असल्याचे दिसत आहे.

इराणचे उपराष्ट्राध्यक्ष जहांगिरी यांनी परराष्ट्रमंत्री झरिफ यांच्या मुलाखतीची ऑडिओ टेप लीक करण्यामागे सौदी आणि इस्रायलचे षडयंत्र असावे, असा दावा केला. गेल्या काही आठवड्यांपासून व्हिएन्ना येथे अणुकराराबाबत अमेरिकेबरोबर सुरू असलेली चर्चा प्रभावित करण्यासाठी झरिफ यांची ऑडिओ टेप लीक केल्याची शक्यता जहांगिरी यांनी वर्तविली. तसेच सदर टेप सौदीच्या माध्यमांपर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्‍नही उपराष्ट्राध्यक्ष जहांगिरी यांनी उपस्थित केला आहे.

leave a reply