इराणकडून संवर्धित युरेनियमच्या साठ्याची घोषणा

तेहरान – अमेरिका आणि इराण यांच्यात व्हिएन्ना येथे अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी रखडल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, इराणने अणुकार्यक्रमावरील संवर्धित युरेनियमच्या साठ्याबाबत मोठी घोषणा केली. आपल्याकडे ६० टक्के शुद्धता असलेल्या ६.५ किलोग्रॅम तर २० टक्के शुद्धता असलेल्या १०८ किलोग्रॅम संवर्धित युरेनियमचा साठा असल्याचे इराणच्या रोहानी सरकारने जाहीर केले. इराणच्या संसदेने दिलेल्या मुदतीआधी संवर्धित युरेनियमचा साठा संपादन करण्यात यश मिळाल्याचा दावा इराणने केला. याचा दाखला देऊन इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या अधिकाधिक जवळ पोहोचत असल्याचे इस्रायली माध्यमे बजावत आहेत.

इराणकडून संवर्धित युरेनियमच्या साठ्याची घोषणाइराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या सरकारचे प्रवक्ते अली राबीई यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना अणुकार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली. ‘इराणच्या संसदेने ठरवून दिल्याप्रमाणे, इराणच्या अणुऊर्जा आयोगाला वर्षभरात २० टक्के शुद्धतेचे १२० किलोग्रॅम संवर्धित युरेनियमच्या साठ्याची निर्मिती करायची होती. पण इराणने गेल्या पाच महिन्यातच यातील १०८ किलोग्रॅम संवर्धित युरेनियमची निर्मिती केली. तर या कमी कालावधीत इराणने ६० टक्के शुद्धतेचे सुमारे साडे सहा किलोग्रॅम संवर्धित युरेनियम प्राप्त केले आहे’, असे राबीई म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने गेल्या महिन्यात तयार केलेल्या अहवालात, २२ मेपर्यंत इराणकडे असलेल्या संवर्धित युरेनियमच्या साठ्याची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. या अहवालात, इराणकडे २० टक्के शुद्धतेचे ६२.८ किलोग्रॅम तर ६० टक्के शुद्धतेचे २.४ किलोग्रॅम संवर्धित युरेनियम असल्याचे म्हटले होते.

इराणकडून संवर्धित युरेनियमच्या साठ्याची घोषणाएप्रिल महिन्यात इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात भूमिगत तळघरात झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर सेंट्रिफ्यूजेसचे मोठे नुकसान झाले. यामुळे इराणचा अणुकार्यक्रम काही प्रमाणात प्रभावित झाला. अन्यथा इराणकडील संवर्धित युरेनियमचा साठा याहून अधिक असता, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. इराणने या स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरून हा आण्विक दहशतवाद असल्याचा ठपका ठेवला होता.

दरम्यान, रोहानी सरकारने प्रसिद्ध केलेली आकडेवारी पाहता इराणने अतिशय वेगाने युरेनियमचे संवर्धन केल्याचे दिसत आहे. इराणची ही घोषणा म्हणजे २०१५ साली झालेल्या अणुकराराच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा केला जातो. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या अणुकरारानुसार, इराणला आपल्या युरेनियम संवर्धनाची शुद्धता ३.६७ टक्के ठेवणे आवश्यक होते. त्याचबरोबर इराणने फक्त २०२.८ किलोग्रॅम इतकाच संवर्धित युरेनियमचा साठा करून ठेवायचा, असे निश्‍चित झाले होते. मात्र इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग पाहता, पुढील काही महिन्यांमध्ये इराण ही मर्यादा लवकरच पार करू शकेल. असे झाले तर इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या खूपच जवळ पोहोचेल, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

leave a reply