‘एक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ने सुलेमानी यांचा सूड घेतला

- लेबेनॉनस्थित संकेतस्थळाचा दावा

बैरुत – कासेम सुलेमानी आणि अबु महमदी अल-मुहानदिस यांच्या हत्येच्या योजनेत सहभागी असलेले अमेरिका व इस्रायलचे वरिष्ठ अधिकारी मारले गेले. कट्टरपंथियांच्या गटाने सुलेमानी आणि मुहानदिस यांच्या हत्येचा सूड घेतला. लेबेनॉनस्थित संकेतस्थळाने कट्टरपंथियांच्या ‘एक्सिस ऑफ रेझिस्टन्स’च्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध केली. गेल्या वर्षी अमेरिकेने इराकमध्ये चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी व मुहानदिस ठार झाले होते. त्यानंतर इराणने अमेरिका व अमेरिकेला सहाय्य करणार्‍यांचा सूड घेण्याची धमकी दिली होती.

इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिलमधील मोहिमेत अमेरिका व इस्रायलच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना ठार केल्याचे ‘द क्रॅडल’ या संकेतस्थळाने म्हटले आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या इरबिलमधील तळावर जून महिन्यात दोन हल्ले झाले. यामध्ये अमेरिकन लष्कराच्या अलबुखिकी आणि रेड हॉर्स युनिटचे अधिकारी ‘लेफ्टनंट कर्नल जेम्स विलिस’ आणि इस्रायलच्या नहाल ब्रिगेडचे अधिकारी ‘कर्नल शॅरोन अस्मान’ यांना ठार केले. हे दोन्ही अधिकारी सुलेमानी आणि मुहानदिस यांच्यावरील हवाई हल्ल्याच्या योजनेत सहभागी होते, म्हणून त्यांना ठार केल्याची माहिती एक्सिस ऑफ रेझिस्टन्सच्या सूत्रांनी लेबेनीज वृत्तसंस्थेला दिली.

पण अमेरिका व इस्रायलने या दोन्ही अधिकार्‍यांच्या मृत्यूबाबत खोटे कारण दिल्याचा आरोप संबंधित सूत्रांनी केला. लेफ्टनंट कर्नल विलिस यांचा कतार येथील अमेरिकेच्या अल-उदैद हवाईतळावरील दुर्घटनेत बळी गेल्याचे पेंटॅगॉनने जाहीर केले. तर कर्नल शॅरोन यांचा मृत्यू इस्रायली लष्करी तळावरील प्रशिक्षणादरम्यान हृदरविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. त्यामुळे विलिस व शॅरोन यांच्या मृत्यूबाबत अमेरिका व इस्रायलने माहिती दडविल्याचा ठपका एक्सिस ऑफ रेझिस्टन्सच्या सूत्राने ठेवला आहे.

विलिस व शॅरोन यांच्यावरील या हल्ल्याव्यतिरिक्त इराकमधील मोसादच्या ठिकाणांवर आणखी दोन वेळा हल्ले झाले होते. इराणच्या नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटानंतर यावर्षी एप्रिल महिन्यात एक हल्ला झाला. तर सप्टेंबर महिन्यात इरबिलमधील मोसादच्या तळाजवळ ड्रोन हल्ले झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी हे हल्ले चढविले होते. पण इराकमधील कुर्दांच्या प्रांतिक सरकारने हे दावे फेटाळले होते. तर इस्रायलने या बातम्यांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. विलिस व शॅरोन यांच्याबाबत लेबेनॉनस्थित संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या बातमीला इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध दिली आहे.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेने इराकच्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ला चढविला होता. या हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी आणि इराकमधील पॉप्युलर मोबिलायझेशन युनिट या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबु महदी अल-मुहानदिस ठार झाले होते. सुलेमानी आणि मुहानदिस यांच्या हत्येनंतर खवळलेल्या इराण, हिजबुल्लाह आणि इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी अमेरिका व अमेरिकेला सहाय्य करणार्‍यांचा सूड घेण्याची धमकी दिली होती.

आखातासह जगभरात तैनात असलेले अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आपल्या निशाण्यावर असतील, असे इराणने धमकावले होते. दरम्यान, इराण आणि हिजबुल्लाह आजही सुलेमानीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी कारस्थाने आखत आहे, असा इशारा अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या संचालिका ख्रिस्तिन अबिझैद यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यामुळे येत्या काळात अमेरिका व इस्रायलवर इराण आणि हिजबुल्लाहकडून हल्ल्याची शक्यता कायम असल्याचे दिसत आहे.

leave a reply