अफगाणिस्तानच्या जनतेतून तालिबानच्या कट्टरवादाविरोधात प्रतिक्रिया येऊ लागली

- सुमारे ७० प्राध्यापक आणि सहप्राध्यापकांचे राजीनामे

काबुल – काबुल विद्यापीठातील उच्चशिक्षित कुलगुरूंना काढून त्यांच्या जागी कट्टरपंथियाची नेमणूक करणार्‍या तालिबानला धक्का बसला आहे. याचा निषेध करून काबुल विद्यापीठातील सुमारे ७० प्राध्यापक आणि सहप्राध्यापकांनी राजीनामे दिले. इतकेच नाही तर मुलींना शिक्षण नाकारणार्‍या तालिबानने आता संगीत निषिद्ध असल्याचे सांगून हेरगिरी करणार्‍या पत्रकारांची हत्या वैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. याचे पडसाद अफगाणिस्तानसह जगभरात उमटत आहेत.

काही दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणी मुलींना शिक्षण नाकारले होते. विद्यापीठ आणि शाळांमध्ये मुलींनी आपल्या मान्यतेनुसार शिक्षण घ्यावे, बुरखा घालावा, असे फर्मान तालिबानने काढले होते. काबुल विद्यापीठातील विद्यार्थीनींनी हे नियम स्वीकरल्याचे दावे करून त्याचे फोटोग्राफ्स तालिबानने प्रसिद्ध केले होते. पण तालिबानच्याच दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर बुरखा घालण्यास भाग पाडल्याचे या विद्यार्थीनींनी जाहीर करून तालिबानचा खरा चेहरा समोर आणला होता.

आता तालिबानने काबुल विद्यापीठाचे मुख्य कुलगुरु मुहम्मद ओस्मान बाबुरी यांना सेवेतून काढून टाकले आहे. उच्चशिक्षित असलेल्या बाबुरी यांच्यावरील कारवाईचे कारण तालिबानने दिलेले नाही. पण त्यांच्याजागी मुहम्मद अश्रफ घैरत या कट्टरपंथियाची निवड करून तालिबानने पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवून दिला.

घैरतच्या निवडीचा विद्यापीठातील प्राध्यापक, सहप्राध्यापक आणि कर्मचार्‍यांनी निषेध नोंदवून राजीनामे दिले. आठवड्याभरात तालिबानने आपला निर्णय मागे घ्यावा, असे या प्राध्यापकांनी बजावले आहे.

तालिबानची शिक्षणव्यवस्था लागू करण्यासाठीच घैरतची निवड झाल्याचा आरोप या प्राध्यापकांनी केला आहे. याआधी घैरतने तालिबानच्या कट्टरपंथी विचारांचे समर्थन केले होते. संगीत निषिद्ध असून अफगाणिस्तानात यावर बंदी टाकावी, अशी मागणी घैरतने केली होती. त्याचबरोबर हेरगिरी करणारा पत्रकार हा शंभर जवानांपेक्षाही धोकादायक असतो, असे सांगून घैरतने पत्रकारांच्या हत्येचे समर्थन केले होते. म्हणूनच घैरतला काबुल विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तालिबानने केलेल्या निवडीवर संताप व्यक्त केला जात आहे.

leave a reply