सेन्सॉरशिप लादणारे चीनचे धोकादायक स्मार्टफोन्स फेकून द्या

- लिथुआनिया सरकारचे जनतेला आवाहन

ाव्हिल्निअस/बीजिंग – चीनच्या प्रगत ‘५जी’ तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन्समध्ये सेन्सॉरशिप करणारी यंत्रणा असून हे फोन्स लिथुआनियातील जनतेने फेकून द्यावेत, असे आवाहन सरकारने केले आहे. लिथुआनियाच्या संरक्षण विभागाने यासंदर्भातील शिफारस केली असून नवे चिनी स्मार्टफोन्स खरेदी न करण्याचा सल्लाही दिला आहे. लिथुआनियाच्या या नव्या पवित्र्यामुळे चिनी राजवट अधिकच बिथरली असून, आपल्या सरकारी मुखपत्राद्वारे चीनने लिथुआनियाला राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी दिली आहे.

जुलै महिन्यात, तैवानने पूर्व युरोपातील लिथुआनियात स्वतंत्र राजनैतिक कार्यालय उभारण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे हे कार्यालय ‘द तैवानीज् रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस’ या नावानेच सुरू करण्यात येणार आहे. तैवानच्या या प्रस्तावाला लिथुआनियानेही अधिकृत मान्यता दिली असून, तैवानमध्ये आपले राजनैतिक कार्यालय सुरू करण्याचेही संकेत दिले आहेत. तैवानबाबत घेतलेल्या निर्णयापूर्वी लिथुआनिया चीनच्या ‘१७प्लस१’ या युरोपिय गटातूनही बाहेर पडला होता.

युरोपिय महासंघातील छोट्या देशांपैकी एक असणार्‍या लिथुआनियाने स्वीकारलेले हे आक्रमक धोरण चिनी राजवटीला अस्वस्थ करणारे ठरले आहे. याची गंभीर दखल घेत चीनने लिथुआनियातील राजदूतांना माघारी बोलावले. त्याचवेळी चीनमधील लिथुआनियाच्या राजदूतांचीही हकालपट्टी केली आहे. त्यापाठोपाठ लिथुआनियात जाणारी ‘कार्गो ट्रेन सर्व्हिस’ बंद केली असून निर्यातही कमी केली आहे. मात्र चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या या दडपशाहीपुढे न झुकता लिथुआनियाने आपण चीनविरोधी भूमिकेवर ठाम असल्याचे नव्या निर्णयातून दाखवून दिले.

लिथुआनियाच्या संरक्षण विभागाने नव्या शिफारसी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात, चीनच्या शाओमीसह हुवेई व वन प्लस या कंपन्यांच्या स्मार्टफोन्समध्ये दोष आढळल्याचे नमूद केले आहे. शाओमीच्या ‘एमआय १०टी ५जी’ या स्मार्टफोनमध्ये सेन्सॉरशिप करणारे ‘बिल्टइन सॉफ्टवेअर’ असल्याची माहिती ‘नॅशनल सायबरसिक्युरिटी सेंटर’च्या अहवालात देण्यात आली आहे. हे सॉफ्टवेअर ‘फ्री तिबेट’, ‘लॉंग लाईव्ह तैवान इंडिपेंडन्स’, ‘डेमोक्रसी मुव्हमेंट’ यासारखे शब्द सेन्सॉर करीत असल्याचे उघड झाले आहे. त्याचवेळी शाओमीच्या स्मार्टफोनमधून ‘फोन डाटा’ सिंगापूरमधील सर्व्हरला पाठविण्यात येत असल्याचेही समोर आले आहे.

शाओमीव्यतिरिक्त हुवेई कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये ‘सिक्युरिटी फ्लॉज्’ अर्थात सुरक्षेला असलेले धोके आढळले आहेत. त्यामुळे लिथुआनियातील जनतेने शाओमी, हुवेई, वन प्लस या चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन्स फेकून द्यावे. नवे फोन घेतानाही चिनी कंपन्यांचे फोन घेऊ नयेत, अशी शिफारस लिथुआनियाच्या संरक्षण विभागाने केली आहे. चिनी स्मार्टफोन्सवर अशा रितीने आक्षेप घेणारा लिथुआनिया हा युरोपातील दुसरा देश ठरला आहे. यापूर्वी बेल्जियमच्या गुप्तचर यंत्रणांनीही चिनी स्मार्टफोन्सच्या वापरावरून आपल्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला होता.

leave a reply