इराण अवघ्या १२ दिवसात अणुबॉम्बसाठी आवश्यक युरेनियम मिळवू शकतो

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा इशारा

Iran Nuclearवॉशिंग्टन – इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या ‘ब्रेक पॉईंट’पासून काही महिने दूर असल्याचा दावा बायडेन प्रशासनाने केला होता. पण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिलेल्या अहवालानंतर, इराण अवघ्या १२ दिवसात एका अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक युरेनियम प्राप्त करू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाने फार मोठी प्रगती केल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला. अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालावर अमेरिका व मित्रदेशांकडून प्रतिक्रिया येत असताना इस्रायल मात्र आश्चर्यकारकरित्या यावर बोलण्याचे टाळत आहे.

इराण ८३.७ टक्के युरेनियमचे संवर्धन करण्यात यशस्वी ठरल्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने प्रसिद्ध केला. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी ९० टक्के युरेनियमचे संवर्धन आवश्यक असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पातील युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ नेणारी आहे, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. आयोगाच्या या अहवालानंतर अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या रिपब्लिकन पक्षाने बायडेन प्रशासनाला धारेवर धरले आहे.

बेकायदेशीररित्या अणुकार्यक्रम राबविणाऱ्या इराणबरोबर बायडेन प्रशासन इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी उत्सूक का होते, असा सवाल प्रतिनिधीगृहाने विचारला. यावर उत्तर देताना अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे उपमंत्री कॉलिन कॅल यांनी बायडेन प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. सात वर्षांपूर्वी २०१५ साली इराणबरोबर करार केला, तेव्हा इराण अणुबॉम्बनिर्मितीपासून एक वर्ष लांब होता. २०१८ सालापर्यंत ही स्थिती कायम होती, असे कॅल म्हणाले.

अशा परिस्थितीत, इराणबरोबरचा करार पुनर्जिवित करून अणुकार्यक्रमाचा वेग मंदावण्याचा प्रयत्न बायडेन प्रशासनाने केला होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये इराणने आपल्या अणुकार्यक्रमात फार मोठी प्रगती केल्याचे कॉलिन कॅल यांनी मान्य केले. आत्ताचा इराण अवघ्या १२ दिवसात एका अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक युरेनियम व आण्विक साहित्य मिळवू शकतो, असा इशारा कॅल यांनी प्रतिनिधीगृहासमोर दिला. असे असले तरी इराणच्या अणुकार्यक्रमाचा हा वाद सोडविण्यासाठी अजूनही राजनैतिक मार्गाचा वापर होऊ शकतो, असा दावा कॅल यांनी केला.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी देखील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालावर चिंता व्यक्त केली. पण इराण अणुबॉम्बची निर्मिती करू शकत नसल्याचा दावा प्राईस यांनी केला. तसेच इराणबरोबर वाटाघाटी तसेच अणुकरार करून हा वाद मिटविण्यासाठी बायडेन प्रशासन उत्सूक असल्याचे प्राईस म्हणाले. पण आयोगाच्या या अहवालानंतर युरोपिय देश अमेरिकेच्या विचारांपासून फारकत घेत असल्याचा दावा अमेरिकन माध्यमेच करू लागली आहे. इराणला रोखण्यासाठी अधिक आक्रमक भूमिका तसेच दबावतंत्राचा वापर करण्याचे संकेत युरोपिय देश देत आहेत.

दरम्यान, अण्वस्त्रसज्ज इराण इस्रायलच नाही तर साऱ्या जगाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा देणाऱ्या इस्रायलने आश्चर्यकारकरित्या गेल्या दोन दिवसांपासून इराणबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायलचे वरिष्ठ नेते लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये बायडेन यांची भेट घेऊन इस्रायलचे नेते इराणबाबतचा आपल्या देशाचा निर्णय जाहीर करू शकतात, असा दावा केला जातो.

leave a reply